LSG vs RCB: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५० वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. लखनौतील एकाना स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात पावसाने बऱ्याचदा हजेरी लावली. त्यामुळे हा सामना १९ षटकांचा खेळवण्यात आला. लखनौकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना मिचेल मार्शने दमदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर लखनौने १९ षटकांअखेर ३ गडी बाद २०९ धावा केल्या. २१० धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला.
पावसामुळे हा सामना १९ षटकांचा खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १९ षटकात २१० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी जेकब बेथेल आणि विराट कोहलीची जोडी मैदानावर आली. या जोडीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. पण प्रिन्स यादवने विराट कोहलीला शून्यावर बाद करत माघारी धाडलं.
९ वर्षांनंतर पहिल्यांदाचं असं घडलं
विराट कोहलीला चेज मास्टर म्हणतात. त्याला चेज मास्टर का म्हणतात हे त्याने गेल्या काही वर्षांमध्ये दाखवून दिलं आहे. त्याने आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला धावांचा पाठलाग करताना अनेक विजय मिळवून दिले आहेत. पण या सामन्यात तो २ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. २०१७ नंतर तो पहिल्यांदाच धावांचा पाठलाग करताना शून्यावर बाद झाला आहे. याआधी २०१७ मध्ये झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर तो आज शून्यावर बाद झाला. त्याला प्रिन्स यादवने भन्नाट वेगाने आत येणारा चेंडू टाकला आणि त्रिफळाचित करून बाद केलं. विराट आयपीएलमध्ये आतापर्यंत ११ वेळेस शून्यावर बाद झाला आहे.
लखनौ सुपर जायंट्सने केल्या २०९ धावा
या सामन्यात लखनौचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला होता. लखनौकडून सलामीला आलेल्या मिचेल मार्शने सर्वाधिक १११ धावांची खेळी केली. तर निकोलस पूरनने ३८ धावांचे योगदान दिले. शेवटी ऋषभ पंतने नाबाद ३२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर लखनौने २० षटकांअखेर २०९ धावा केल्या.
