अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी के.एल.राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. ऋषभ पंतचं उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे. ऋषभला वनडे संघातूनही वगळण्यात आलं आहे. दमदार फॉर्मात असणाऱ्या इशान किशनचं वनडे संघात पुनरागमन झालं आहे.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्मात असणाऱ्या देवदत्त पड्डीकलचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. गुरनूर ब्रार, मानव सुतार आणि हर्ष दुबे यांचीही पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठीची तयारी या मालिकेपासून सुरू होत आहे. यामुळे माजी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह हार्दिक पंड्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघाला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर भारतीय संघ वनडे आणि टी२० क्रिकेट खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठीच्या संघातून रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज आकाश दीप यांना वगळण्यात आलं आहे. मानव सुतार, हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांना संधी मिळाली आहे.
अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या भारत दौऱ्यावर येत आहे. अफगाणिस्तानचा संघ मुल्लापूर अर्थात न्यू चंदीगढ इथे एकमेव कसोटी खेळणार आहे. ६ ते १० जून या कालावधीत ही कसोटी होणार आहे. मुल्लापूरच्या मैदानावरचा हा पहिलाच कसोटी सामना असणार आहे. यानंतर अफगाणिस्तानचा संघ तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. धरमशाला, लखनौ आणि चेन्नई इथे हे सामने होणार आहेत.
भारतीय खेळाडू सलग महिनाभर टी२० वर्ल्डकपच्या निमित्ताने व्यग्र होते. त्यानंतर लगेचच सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत २ महिने सातत्याने खेळत होते. भारतीय संघाचं यापुढचंही व्यग्र वेळापत्रक लक्षात घेता अफगाणिस्तानच्या या छोटेखानी दौऱ्यासाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात येईल अशी चिन्हं होती.
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी संघ
शुबमन गिल (कर्णधार), के.एल.राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पड्डीकल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, मानव सुतार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.
वनडे मालिकेसाठी संघ
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल.राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.
