Prince Yadav Reveals Virat Kohli Advice for Bowling: लखनौ सुपर जायंट्स संघाने सलग सहा गमावल्यानंतर आरसाबीचा ९ धावांनी पराभव करत महिन्याभरानंतर विजय मिळवला. मिचेल मार्श, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी व शाहबाज अहमद या खेळाडूंचं मोठं योगदान आहे. प्रिन्स यादवने या सामन्यात ३ विकेट्स घेतल्या, पण त्याची सर्वाधिक चर्चेतील विकेट ठरली ती म्हणजे विराट कोहलीची. दुसऱ्याच चेंडूवर विराट कोहलीला क्लीन बोल्ड करत प्रिन्सने संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. विराटच्या या विकेटबाबत प्रिन्स यादवने मोठं वक्तव्य केलं आहे.

लखनौ सुपर जायंट्सच्या युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने विराट कोहलीला क्लीन बोल्ड करून क्रिकेट जगताला चकित केलं. २१३ धावांचे लक्ष्य गाठताना संघाला विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण प्रिन्सने त्याला मैदानावर टिकू दिलं नाही. प्रिन्सने तर गुरुची विद्या गुरुला देऊ करत किंगला बाद केलं. प्रिन्सने सामन्यानंतर सांगितलं की कोहलीनेच त्याला या लाईन लेंथवर बॉलिंग करायला सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे गोलंदाजी केल्याने ही विकेट मिळाली

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात जेकब बेथेलला स्वस्तात बाद केलं आणि त्यानंतर लगेचच प्रिन्स यादवने सामन्याच्या दुसऱ्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर विराट कोहलीला बाद केलं. प्रिन्सने आधी एक आउटस्विंगर टाकला, त्यानंतर ताशी १४०.४ किमी वेगाने टाकलेल्या वेगवान इनस्विंगरवर कोहलीला त्रिफळाचीत केलं.

विराट कोहलीच्या विकेटबाबत प्रिन्स यादवचं मोठं वक्तव्य

“पहिल्याच चेंडूवर माझ्याकडून मिसफिल्ड झाली होती, पण मला माहित होतं की ती गोष्ट लगेच मागे सोडून द्यायची, लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही. गेल्या सामन्यानंतर मी विराट भाईसोबत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली, चेंडू ऑफ स्टंपच्या लेंथवर मुव्ह होत असेल, तर त्याच लेंथवर कायम गोलंदाजी करत राहा. मी तेच केलं आणि विकेटच्या रूपात त्याचा रिझल्ट मिळाला,” असं विराट कोहलीची विकेट घेतल्यानंतर तो म्हणाला. “आम्ही सलग सहा सामने गमावले आहेत, पण तरीही आम्ही मेहनत करणं थांबवणार नाही,” असंही त्याने ठामपणे सांगितलं.

२०२३ च्या हंगामानंतर आयपीएलमध्ये कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला, त्याने सलग ४६ डाव शून्यावर न बाद होता खेळले होते. विराट कोहलीची विकेट घेऊन प्रिन्स यादवने एक मोठी कामगिरी केली आहे. आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीला शून्यावर बाद करणारा तो केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी केवळ धवल कुलकर्णीने हा पराक्रम केला होता. धवल कुलकर्णीने २०१६ मध्ये विराट कोहलीला शून्यावर बाद केलं होतं.