लखनौ सुपर जायंट्स संघाची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी फारशी चांगली राहिली नसली तरी त्यांच्या गोलंदाजी विभागाने मात्र प्रभावित केलं. लखनौचा गोलंदाज प्रिन्स यादवने यंदाच्या स्पर्धेत चांगली गोलंदाजी करत आपली प्रतिभा सिद्ध केली. प्रिन्स यादवला रोहित शर्मा व विराट कोहली यांच्याबरोबर आगामी २०२७ चा विश्वचषक खेळण्याची इच्छा आहे आणि त्यांच्यासाठी हा विश्वचषक त्याला जिंकायचा देखील आहे. याचा व्हीडिओ लखनौ संघाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रिन्स यादव हा मूळचा दिल्लीचा असून या २४ वर्षीय गोलंदाजाने लखनौ फ्रँचायझीसाठी नऊ सामन्यांमध्ये १३ बळी घेतले असून, तो आयपीएल २०२६ मधील सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आहे. प्रिन्सची या वर्षीच्या आयपीएलमधील प्रभावी कामगिरी पाहता, भविष्यात त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरत आहे. या दरम्यान त्याने केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून त्याचं कौतुक केलं जात आहे.
LSG ने सोशल मीडियावर हल्लीच शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, प्रिन्स म्हणाला की त्याला भारताच्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक संघात सामील होऊन रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी ही स्पर्धा जिंकायची आहे. त्याच्या मते, विराट आणि रोहितकडे एकदिवसीय विश्वचषक वगळता जवळपास सर्व ट्रॉफी आहे आणि त्याला आगामी ५० षटकांच्या या महास्पर्धेत त्यांच्यासोबत खेळून ती जिंकायची आहे.
प्रिन्स यादव या व्हीडिओमध्ये म्हणताना दिसत आहे की, “माझं सध्याचं ध्येय हे आहे की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासोबत २०२७ च्या विश्वचषकात खेळून तो जिंकणं. त्यांच्याकडे आधीच जवळपास सर्व ट्रॉफी आहेत. फक्त ५० षटकांचा विश्वचषक बाकी आहे. त्यामुळे भारताने आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२७ जिंकावा आणि मी त्या संघाचा भाग असावा. आपण जर तो विश्वचषक जिंकलो तर त्या दोघांसाठी ती खूप छान गोष्ट ठरेल.”
रोहित शर्मा व विराट कोहली या भारताच्या दिग्गज जोडीने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या दोघेही फक्त एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहेत. आगामी एकदिवसीय चषकात खेळण्याच्या दृष्टीने दोघे कसून मेहनत घेत आहेत.
