Prithvi Shaw Akriti Agarwal Controversy: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. एकेकाळी त्याला भारतीय क्रिकेटचं भविष्य मानलं जात होतं, परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा परिणाम त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर झाला. पृथ्वीचा या वर्षीच्या मार्च महिन्यात आकृती अग्रवाल हिच्याशी साखरपुडा झाला होता, मात्र त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाल्याचे संकेत सोशल मीडियावरील आकृतीच्या पोस्टमुळे मिळत आहेत. आकृतीच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून पृथ्वी शॉ ने तिला धोका दिल्याचं तिने म्हटलं आहे.

पृथ्वीची होणारी पत्नी आकृतीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. तिने यात पृथ्वी शॉचं नाव स्पष्टपणे घेतलं नसलं तरी, पण या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सोशल मीडियावर काही काळापासून सुरू होती. अशा स्थितीत, आकृतीने शॉचे नाव न घेता एक मेसेज पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने वारंवार फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे त्यांचा साखरपुडा मोडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाबाबत दोन्हीपैकी कोणत्याही बाजूने अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही.

पृथ्वी आणि आकृती यांच्यातील नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या सतत समोर येत होत्या. अशातच, आकृतीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. मात्र, शॉसोबतची तिची साखरपुडा मोडल्याबाबत तिने कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही. आकृतीने तिच्या इन्स्टाग्रामवरील साखरपुड्याशी संबंधित आणि पृथ्वी शॉ बरोबरचे सर्व फोटोही काढून टाकले आहेत.

ती पोस्ट शेअर करताना आकृतीने लिहिलं, “माझी अनेकदा फसवणूक झाली, तरीही मी काहीच बोलले नाही. नात्यात एक पाऊल पुढे टाकल्यानंतरही, हे सर्व खरं आहे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. त्या सर्व अफवा खऱ्या आहेत. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल जे काही दाखवलं जात आहे, ते सर्व खरं आहे.” आकृतीने या पोस्टमध्ये कुठेही शॉ किंवा तिच्या साखरपुड्याचा उल्लेख केलेला नाही. तरीही, त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर आधीपासूनच चर्चा सुरू होत्या; म्हणूनच तिच्या या पोस्टचा संबंध तुटलेल्या साखरपुड्याशी जोडला जात आहे.

शॉच्या नेतृत्वाखाली भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला आणि त्याला भारतीय क्रिकेटचं भविष्य मानलं जात होतं. कसोटी पदार्पणाच्या सामन्यात पृथ्वीने शतक झळकावलं होतं, पण खराब फॉर्ममुळे त्याला नंतर भारतीय संघातून वगळण्यात आलं. तसेच, डोपिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्याला बंदीलाही सामोरं जावं लागलं. त्यानंतर, एका तरुणीशी संबंधित वादामुळेही तो मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला.