Prithvi Shaw IPL 2026 Auction: मुंबईचा फलंदाज पृथ्वी शॉ गेल्या काही काळापासून आयपीएलपासून दूर होता. दिल्ली कॅपिटल्स संघाडून सात हंगाम खेळल्यानंतर त्याला आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी डच्चू देण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा दिल्लीच्या संघानं त्याला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे. पृथ्वी शॉचे पुनरागमन होताच आता त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीची चर्चा होत आहे. आधी अनसोल्ड राहिल्यानंतर पृथ्वीने हार्ट ब्रेक झाल्याचे स्टेटस ठेवले होते. मात्र दिल्लीने विकत घेताच त्याने आधीचे स्टेटस डिलीट केले.
मंगळवारी (१६ डिसेंबर) अबु धाबी येथे झालेल्या आयपीएलच्या छोट्या लिलावात पहिल्या दोन फेऱ्यात पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिला. यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर साईबाबांचा फोटो ठेवत प्रार्थना केली होती. त्यानंतर तो पुन्हा अनसोल्ड राहिल्यानंतर त्याने हार्ट ब्रेक झाल्याचा इमोजी ठेवत एक स्टेटस शेअर केले होते. मात्र अखेरच्या टप्प्यात दिल्लीने त्याच्या बेस प्राईजवर संघात सामावून घेतल्यानंतर त्याने आधीचे स्टेटस हटवले.
मुख्य लिलाव प्रक्रियेत शॉची निवड झाली नाही. यासाठी त्याला दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागली. अखेर शेवटच्या फेरीत निवडलेल्या ११ खेळाडूंमध्ये शॉचा समावेश होता. दिल्ली कॅपिटल्सने बेस प्राईजमध्ये पृथ्वी शॉला आपल्या ताफ्यात सामील केले.
‘मी माझ्या कुटुंबात परतलो’, असे नवे स्टेटस पृथ्वी शॉने इन्स्टाग्रामवर ठेवले.
२०१८ मध्ये भारतासाठी १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकल्यानंतर झालेल्या आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉला १.२ कोटी रुपये खर्चून संघात घेतले होते. शॉने सात हंगाम दिल्लीचे प्रतिनिधित्व केले. आयपीएलच्या ७९ सामन्यात त्याने २३.५ च्या सरासरीने १,८९२ धावा केल्या. यात १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
२०२५ च्या मेगा लिलावापूर्वी संघाने त्याला सोडले होते. दिल्ली कॅपिटल्स संघाचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनी तेव्हा म्हटले होते की, पृथ्वी शॉला त्याच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी आयपीएलमधून विश्रांती देण्याची गरज होती. गेल्या काही वर्षात पृथ्वी शॉला आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला. गेलेला फॉर्म आणि मैदानाबाहेरील वादामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली होती.
रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी सुरुवातीला चांगली कामगिरी केल्यानंतर हाच फॉर्म त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये टिकवता आला नाही. स्पर्धेतील सात सामन्यांमध्ये त्याने १६०.५२ च्या स्ट्राईक रेट आणि २६ च्या सरासरीने १८३ धावा केल्या.
