प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या दिल्ली आणि लखनौ संघांनी २०हून अधिक खेळाडूंना यंदाच्या हंगामात खेळण्याची संधी दिली. मात्र दिल्लीने पृथ्वी शॉ याला आणि लखनौने अर्जुन तेंडुलकरला एकदाही संघात घेतलेलं नाही. इम्पॅक्ट प्लेयरच्या यादीतही घेतलेलं नाही.
चांगल्या सुरुवातीनंतर दिल्ली कॅपिटल्स संघाची घसरगुंडी उडाली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क फिट झाल्यानंतर दिल्लीने त्याला संघात समाविष्ट करण्यासाठी डेव्हिड मिलरसारख्या अनुभवी टी२० विशेषज्ञ खेळाडूला राखीव खेळाडूंमध्ये बसवलं. स्ट्राईकरेटच्या तुलनेत खूप पिछाडीवर राहणाऱ्या पाथुम निसांकालाही खेळवलं पण मिलरला बाहेर ठेवलं. या निर्णयावर माजी खेळाडू, समालोचाकांनीही टीका केली होती. मिलरकडे दशकभराहून अधिक काळ आयपीएल खेळण्याचा अनुभव आहे. मोठी धावसंख्या उभारणं असो किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग असो- मिलर कोणत्याही टी२० संघासाठी अविभाज्य भाग असतो. दिल्ली संघाला मात्र तसं वाटत नाही.
दिल्ली संघाने सोमवारी पंजाबविरुद्धच्या लढतीत संघात ५ बदल केले मात्र तरीही पृथ्वी शॉ याला संधी देण्यात आली नाही. एकीकडे आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य हे युवा धडाकेबाज सलामीवीर पॉवरप्लेचा अचूक फायदा उठवत तडाखेबंद फटकेबाजी करत आहेत. पृथ्वी शॉ अशा स्वरुपाची फटकेबाजी करण्यात माहीर आहे. के.एल.राहुल आणि पाथुम निसांका हे दोघेही प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीची फलंदाजी करतात. पृथ्वी २० चेंडू खेळला तरी सामन्याचं पारडं फिरवू शकतो. मात्र त्याला एकही संधी देण्यात आलेली नाही.
गेल्या हंगामात अभिषेक पोरेलने दिल्लीसाठी खेळताना ३०१ धावा केल्या होत्या पण यंदा त्याला केवळ एका सामन्यात संधी मिळाली. टी२० प्रकारात धावांसाठी झगडणाऱ्या आणि अनेक झेल सोडणाऱ्या करुण नायरलाही दिल्लीने अनेकदा खेळवलं पण पृथ्वी शॉ याचा निवडीसाठी विचार झाला नाही. नाशिककर १८वर्षीय साहील पारखला पदार्पणाची संधी देण्यात आली. सोमवारच्या लढतीत माधव तिवारीलाही संधी मिळाली. पण पृथ्वीच्या नशिबात तो योग दिसत नाही.
२०१८ हंगामात पृथ्वीने १८वर्षीय ९ सामन्यात १५३च्या स्ट्राईकरेटने खेळताना २४५ धावा केल्या होत्या. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश होता. २०१९ मध्ये त्याने १६ सामने खेळताना १३३.७१च्या स्ट्राईकरेटने ३५३ धावा केल्या. २०२० हंगामात पृथ्वीच्या धावा कमी झाल्या. २०२१ मध्ये मात्र पृथ्वीने १५ सामन्यात १५९.१३च्या स्ट्राईकरेटने ४७९ धावा केल्या होत्या. यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश होता. २०२२ मध्ये पृथ्वीच्या धावा आटल्या. २०२३ हंगामात त्याला १०६ धावाच करता आल्या. २०२४ मध्येही परिस्थिती फार बदलली नाही. त्यामुळेच २०२५ मध्ये आयपीएल लिलावात तो अनसोल्ड गेला. यंदाच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने ७५ लाखांची बोली लावत पृथ्वीला संघात घेतलं. त्यावेळी पृथ्वी दिल्ली कॅपिटल्सच्या योजनांचा भाग असेल असं वाटलं होतं. दिल्लीला पॉवरप्लेच्या षटकांचा फायदा उठवेल अशा सलामीवीराची गरज होती. पण त्यांना राहुल-निसांका जोडीला प्राधान्य दिलं. पृथ्वीने आयपीएल स्पर्धेत ७९ सामन्यात १४७.४६च्या स्ट्राईकरेटने १८९२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १४ अर्धशतकं आहेत.
दिल्ली कॅपिटल्सने सोमवारच्या लढतीपर्यंत २१ खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर दिल्लीचे दोन संघ खेळले पण तरीही पृथ्वी संघाबाहेरच राहिला.
लिलावापूर्वी लखनौ सुपरजायंट्सने ट्रेडऑफमध्ये शार्दूल ठाकूरला मुंबईला दिलं आणि अर्जुन तेंडुलकरला ताफ्यात घेतलं. यंदाच्या हंगामात लखनौचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अर्जुन अजूनही संधीच्या प्रतीक्षेत आहे. लखनौच्या बाबतीत एक मुद्दा खरा की त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. प्रिन्स यादवने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत सातत्याने विकेट्स पटकावल्या आहेत. विराट कोहलीला त्रिफळाचीत करत प्रिन्सने सगळ्यांची वाहवा मिळवली. मोहम्मद शमी लखनौच्या गोलंदाजी विभागाचा प्रमुख आहे. शमी यंदा फलंदाजांच्या तडाख्याचा सामना करत आहे. झंझावाती फॉर्मात असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला मोहसीन खानने विकेट मेडन टाकली होती. मात्र त्यानंतर मोहसीनने दुखापतींनी सतवलं आहे. अवेश खानही यंदा महागडा ठरतो आहे. फिरकी गोलंदाजांमध्ये दिग्वेश राठी नियमितपणे खेळतो आहे. त्याच्या बरोबरीने मनीमरन सिद्धार्थनेही काही सामने खेळले आहेत. दुखापतीतून सावरत मयांक यादवनेही पुनरागमन केलं. दक्षिण आफ्रिकेचा अँनरिक नॉर्किया यंदा अवघा एक सामना खेळला आहे.
लखनौचा संघ सुरुवातीपासूनच झगडताना दिसला. कधी फलंदाजीत मार खात होते, कधी गोलंदाजीत. त्यांच्या निर्णयांमध्ये सातत्य नव्हतं. ट्रेडऑफ करून घेतलेल्या खेळाडूला एका सामन्यात खेळवता आलं असतं. आव्हान संपुष्टात आल्यानंतर संधी दिली तर त्या खेळाडूला काय प्रोत्साहन मिळेल? सतत हरत असल्यामुळे लखनौनं संघात सातत्याने बदल केले. त्यांनी तब्बल २१ खेळाडूंना संधी दिली पण अर्जुनला राखीवमध्येच बसवलं.
