Priyansh Arya Prabhsimran Singh Record: धरमशालाच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. हार्दिक पंड्या व सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहकडे संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. या सामन्याची नाणेफेक मुंबई इंडियन्सने जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पंजाबकडून प्रियांश आर्य व प्रभसिमरन सिंगची जोडी फलंदाजीसाठी आली. दोघांनी संघाला चांगली सुरूवात करून दिल्यानंतर एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
पंजाब किंग्सचा संघ सलग चार पराभवानंतर या महत्त्वाच्या सामन्यात खेळण्यासाठी उतरला आहे. पहिल्या सात सामन्यांनंतर संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता, मात्र त्यानंतर संघाची लय बिघडली आणि टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत त्यांना मोठा धक्का बसला. आता मुंबई इंडियन्सविरूद्धचा सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकण्याकडे संघाचा कल असेल.
प्रभसिमरन सिंग प्रियांश आर्यच्या जोडीचा मोठा विक्रम
पंजाब किंग्जचे सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी आयपीएलमध्ये इतिहास घडवला आहे. आयपीएलच्या इतिहासात १००० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करणारी ही पहिली अनकॅप्ड सलामीवीर जोडी ठरली.
मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात पंजाबच्या धावसंख्येने २४ धावांचा टप्पा पार करताच या जोडीने हा खास विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यातही दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र, दीपक चहरने प्रियांश आर्यला २२ धावांवर बाद करत ही भागीदारी तोडली.
दरम्यान, प्रभसिमरन सिंगनेही आणखी एक मोठा टप्पा गाठला. २०२५ मध्ये ५४९ धावा आणि २०२६ मध्ये ४३९* धावा करणारा प्रभसिमरन, आयपीएलच्या एकापेक्षा अधिक हंगामांत ४००+ धावा करणारा तिसरा अनकॅप्ड भारतीय फलंदाज ठरला. याआधी सूर्यकुमार यादव (२०१८, २०१९, २०२०) आणि अभिषेक शर्मा (२०२२, २०२४) यांनी ही कामगिरी केली होती.
प्रभसिमरन सिंग व प्रियांश आर्यच्या जोडीने संघाला चांगली सुरूवात करून दिली. प्रियांश आर्य २२ धावावर बाद झाल्यानंतर प्रभसिमरने सिंगने ५७ धावांची खेळी केली. यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत संघाचा डाव सावरला. यानंतर खालच्या फळीत आलेल्या अजमतुल्ला ओमरझाईने ३८ धावांची खेळी करत संघाला २०० धावांपर्यंत नेण्यात मोठी भूमिका बजावली. यानंतर विष्णु विनोद १५ तर झेवियर बार्टलेट १८ धावांचं योगदान दिलं आणि संघाला २०० धावांपर्यंत नेलं.
यापूर्वी धरमशालामध्ये झालेल्या आयपीएल २०२६ सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करण्याची बुमराहची ही पहिलीच वेळ ठरली. नियमित कर्णधार हार्दिक पंड्या पाठदुखीच्या त्रासातून सावरत आहे, तर हंगामी कर्णधार सूर्यकुमार यादव वैयक्तिक कारणांमुळे या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता.
