Priyansh Arya Creates History in IPL 2026: धरमशालामधील मनमोहक स्टेडियममध्ये पंजाब किंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पंजाब व दिल्ली दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल केले आहेत. पंजाब किंग्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता आणि त्यांनी २१० धावांचा डोंगर उभारला. यामध्ये प्रियांश आर्य व श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीने मोठी भूमिका बजावली. तर प्रियांश आर्यने या खेळीदरम्यान मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

पंजाब किंग्सने या सामन्यात लॉकी फर्ग्युसनच्या जागी बेन द्वारशुईसला संघात स्थान दिलं आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने संघात पाच बदल केले आहेत. अभिषेक पोरेल, साहिल पारख, डेव्हिड मिलर, माधव तिवारी व आकिब नबी या गोलंदाजांना संधी दिली. दरम्यान माधव तिवारी या अष्टपैलू खेळाडूने प्रियांश आर्यची महत्त्वपूर्ण विकेट संघाला मिळवून दिली.

प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी पंजाब किंग्ससाठी डावाची सुरुवात केली. अक्षर पटेलने पहिलं षटक ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज, मिचेल स्टार्ककडे सोपवलं. स्टार्कने पहिल्याच चेंडूवर फुल लेंथ चेंडू टाकला आणि प्रियांशने कव्हर पॉइंटवरून एक गगनचुंबी षटकार ठोकून संघाचं खातं उघडलं.

प्रियांश आर्याने आयपीएल सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याची ही दुसरी वेळ होती. यासह, पंजाबच्या या सलामीवीराने आयपीएल सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दोनदा हा पराक्रम करणारा प्रियांश पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, प्रियांशने २०२५ मध्ये खलील अहमदच्या गोलंदाजीवर सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. नमन ओझा, विराट कोहली, फिल सॉल्ट आणि यशस्वी जैस्वाल यांनीही आयपीएल सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आहे, पण त्यांनी हा विक्रम फक्त एकदाच केला आहे.

प्रियांश आर्यचा मोठा विक्रम

प्रियांश आर्याने तिसऱ्यांदा आपल्या आयपीएल डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो यशस्वी जैस्वालच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. यशस्वीने आयपीएल डावाच्या पहिल्याच चेंडूवर चार वेळा षटकार मारला आहे.

प्रियांशने या सामन्यात स्फोटक फलंदाजी करत अवघ्या २४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं. आयपीएलमधील हे त्याचं पाचवे अर्धशतक होतं. मात्र, तो ५६ धावांवर बाद झाला. त्याने सहा षटकार आणि दोन चौकारांसह ३३ चेंडूंमध्ये ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रियांशने प्रभसिमरनसोबत ४१ चेंडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करून पंजाबला स्फोटक सुरुवात करून दिली. प्रभसिमरन या सामन्यात केवळ १८ धावाच करू शकला.