प्रो कबड्डी लीग 2018तील सहाव्या पर्वामध्ये आज यू मुंबा आणि पुणेरी पलटन यांच्यात रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला  हा रंगतदार सामना 32-32 असा बरोबरीत संपला. या सत्रातील हा दुसराच सामना होता. यू मुंबाकडून सिध्दार्थ देसाईने उत्कृष्ट खेळ करताना 14 गुणांची कमाई केली, याशिवाय फजल अत्रचली आणि धर्मराज चेरालाथन यांनी दमदार बचावात्मक खेळ सादर करताना आपल्या संघासाठी 4-4 गुण मिळवले. पुणेरी पलटनकडून नितीन कुमारने 15 गुणांची कमाई केली, त्याला मोनूने चांगली साथ देत 5 गुण कमावले आणि पुण्याचा संघ सामना बरोबरीत सोडवण्यात यशस्वी झाला.

सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये यू मुंबाने 20-18 अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती. मुंबईकडून पहिल्या सत्रात सिद्धार्थ देसाई आणि नवा कर्णधार फजल अत्रचलीने शानदार प्रदर्शन केलं. मात्र, नितिन तोमरच्या दमदार खेळामुळे दुसऱ्या सत्रात पुण्याच्या संघाने तोडीसतोड खेळ केला. चढाई करुन नितिन तोमर संघाला गुण मिळवून देत होता, मात्र बचावफळीच्या ढिसाळ कामगिरीचा फटका त्यांना बसला. दोन्ही संघाच्या बचावफळीची कामगिरी गचाळ राहिली. अखेरच्या दहा मिनिटापर्यंत यू मुंबाकडे 27-25 अशी आघाडी कायम होती. त्याच जोरावर यू मुंबाने 32-30 अशी आघाडी घेतली होती. मात्र, अखेरच्या चढाईत यू मुंबाच्या खेळाडूची पकड करून पुण्याने सामना 32-32 असा बरोबरीत सोडवला. शेवटच्या मिनिटात मोनूने मुंबईचा कर्णधार फजल याला बाद केलं, त्यानंतर बचावफळीने सिद्धार्थ देसाईची पकड केली आणि सामना बरोबरीत सुटला.

मुंबईचा पुढील सामना जयपूर पिंक पॅंथर्स संघासोबत 10 ऑक्टोबर रोजी आहे. तर पुण्याचा सामना उद्या हरीयाणा स्टीलर्सविरोधात आहे.