चढाईपटू आणि बचावफळीतल्या खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर, प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात हरयाणा स्टिलर्सने दबंग दिल्लीवर मात केली. 34-27 च्या फरकाने सामना जिंकत हरयाणा स्टिलर्स संघाने स्पर्धेतला आपला पाचवा विजय नोंदवला.

पहिल्या सत्रात दोन्ही संघ सावध पवित्रा घेऊन खेळत होते. मात्र हरयाणाकडून विकास कंडोलाने आक्रमक चढाया करण्याचा सपाटा लावत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर हरयाणाने सामन्यात मागे वळून पाहिलंच नाही. विकासने सामन्यात चढाईमध्ये 9 तर नवीनने 5 गुणांची कमाई केली. महत्वाची गोष्ट म्हणजे हरयाणाच्या बचावपटूंनीही आज आपल्या अन्य खेळाडूंना चांगली साथ दिली. सचिन शिंगाडेने बऱ्याच दिवसांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत बचावात 4 गुण मिळवले.

दुसरीकडे दबंग दिल्लीच्या खेळाडूंनीही हरयाणाला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र बचावफळीत रविंदर पेहलचा अपवाद वगळता एकाही खेळाडूचं फॉर्मात नसणं दिल्लीला भोवलं. चढाईत नवीन कुमार, चंद्रन रणजीत यांनी मिळून 15 गुणांची कमाई केली. या खेळीच्या जोरावर दिल्लीने दुसऱ्या सत्रात हरयाणाला चांगली टक्कर दिली. मात्र मोक्याच्या क्षणी बचावपटूंकडून चांगली कामगिरी न होणं दिल्लीला चांगलंच महागात पडलं. अखेर हरयाणाने सामन्यात 34-27 ने बाजी मारली.