scorecardresearch

Pro Kabaddi Season 5 – तामिळ थलायवाजची एक चूक आणि सामना बंगळुरुच्या पदरात

अमित हुडाच्या एका चुकीने बंगळुरु बुल्स विजयी

Pro Kabaddi Season 5 – तामिळ थलायवाजची एक चूक आणि सामना बंगळुरुच्या पदरात
पिछाडी भरुन काढत तामिळ थलायवाजची सामन्यात चांगलं पुनरागमन

प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वातील हैदराबाद शहरातले सामने संपल्यानंतर हे वादळं आज महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरात येऊन धडकलं. नागपूर शहरात पार पडलेल्या पहिल्याच रोमांचक सामन्यात बंगळुरु बुल्सच्या संघाने नवोदित तामिळ थलायवाजवर केवळ एका गुणाच्या फरकाने मात केली. बंगळुरु बुल्सने तामिळ थलायवाजवर ३२-३१ अशी मात केली. सुरुवातीपासून पिछाडीवर पडलेल्या तामिळ थलायवाज संघाने सामन्याच्या दुसऱ्या सत्रात जोरदार मुसंडी मारत पुनरागमन केलं. रेडींगमध्ये अजय ठाकूर आणि डाँग जॉन ली तर डिफेन्समध्ये बदली खेळाडू डी. प्रताप यांनी केलेल्या मेहनतीवर उजवा कोपरारक्षक अमित हुडाने पाणी फिरवत सामना बंगळुरुच्या संघाला बहाल केला. बंगळुरुच्या संघाकडे केवळ एका गुणाची आघाडी असताना शेवटच्या काही मिनीटांमध्ये वॉकलाईनच्या जवळ बंगळरुच्या रेडरला टॅकल करण्याची चुक तामिळ थलायवाजला या सामन्यात नडली.

याआधी बंगळुरु बुल्सचा कर्णधार रोहीत कुमारने सामन्याची सुरुवात आक्रमकतेने केली होती. सुरुवातीच्या ३ मिनीटांमध्ये सामन्यात गुणफलक हा बरोबरीत होता. मात्र त्यानंतर रोहीत कुमार आणि अजयने तामिळ थलायवाजचा बचाव अक्षरश: खिळखिळा करुन टाकला. यात पहिल्या सत्रात अनुभवी कोपरारक्षक अमित हुडाच सतत अपयशी ठरण हे तामिळच्या संघाला वारंवार महागात पडताना दिसतंय. रेडींग डिपार्टमेंटमध्ये तामिळ थलायवाजला पहिल्या सत्रात फारसे पॉईंट घेता आलेच नाहीत. अजय ठाकूर आणि कंपनीने सुरुवातीचे काही पॉईंट हे फक्त बोनस रेषा पार करुन मिळवले होते.

बंगळुरुकडून रविंदर पेहल आणि महिंदर या खेळाडूंनी बचावात तामिळ थलायवाजच्या रेडर्सना धोबीपछाड दिला. विशेषकरुन तामिळ थलायवाजच्या अजय ठाकूरला रविंदर पेहल आणि महिंदर सिंह या जोडगोळीने चांगलच टार्गेट केलं. पहिल्या सत्रात सुमारे १० मिनीटांपेक्षा जास्त काळ अजय ठाकूरला संघाबाहेर बसवून ठेवण्यात या जोडगोळीचाच मोठा वाटा होता. बंगळरुचा कर्णधार रोहीत कुमारने रेडींगसोबत डिफेन्समध्येही काही सुरेख पॉईंट मिळवत आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला. त्यामुळे पहिल्या सत्राअखेरीस बंगळरुच्या संघाकडे २३-८ अशी आघाडी होती.

मात्र दुसऱ्या सत्रात तामिळ थलायवाजच्या संघाने सामन्यात पुनरागमन केलं. अजय ठाकूरने एकामागोमाग एक रेड करत बंगळुरुच्या संघाला बॅकफूटवर ढकललं. त्याला डिफेन्समध्ये बदली खेळाडू डी. प्रतापने चांगली साथ दिली. या जोरावर दुसऱ्या सत्रात तामिळ थलायवाजने बंगळरु बुल्सला ऑलआऊट करत आपली पिछाडी भरुन काढली. या सत्रात डिफेन्समध्ये डी.प्रताप या खेळाडूने काही महत्वाचे पॉईंट मिळवत तामिळ संघाला पुन्हा एकदा सामन्यात आणून ठेवलं. दुसऱ्या सत्रात रेडींग डिपार्टमेंटमध्ये कोरियाचा खेळाडू डाँग जॉन ली यानेही आपल्या चपळाईचा नमुना दाखवत काही महत्वाचे पॉईंट मिळवले. त्यामुळे दुसऱ्या सत्रात बंगळरु बुल्सला दोनवेळा ऑलआऊट करण्यात तामिळ थलायवाजला यश आलं.

मात्र अखेरच्या मिनीटामध्ये अमित हुडाने केलेल्या चुकीमुळे डी.प्रताप आणि इतर खेळाडूंनी केलेल्या मेहनीतवर पाणी फिरलं. तामिळ थलायवाजचा या पर्वातला हा दुसराच सामना आहे. दोन्ही सामन्यात त्यांच्या पदरी पराभव आले असले तरीही त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला विजयासाठी झगडायला लावलं होतं. त्यामुळे आगामी काळात आपल्या काही चुकांवर काम केल्यास तामिळ थलायवाज संघ नक्की चांगली कामगिरी करु शकेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-08-2017 at 21:28 IST

संबंधित बातम्या