बचावफळीतला अनुभवी खेळाडू रविंदर पेहलची अनुपस्थिती आज बंगळुरु बुल्सला महागात पडली. यूपी योद्धाजच्या संघाने आजच्या दुसऱ्या सामन्यात बंगळुरु बुल्सच्या संघावर ३२-२७ अशी मात केली.

रविंदरच्या अनुपस्थितीत आज बंगळरुची बचावफळी ही विखुरलेली पहायला मिळाली. महिंदर सिंह आणि आशिष कुमार या बचावपटूंनी मिळून आजच्या सामन्यात फक्त ४ पॉईंट हे बचावात घेतले. याव्यतिरीक्त प्रितम छिल्लरसारख्या अनुभवी खेळाडूलाही आजच्या सामन्यात कोणतीही छाप सोडता आलेली नाही. कर्णधार रोहीत कुमारने या सामन्यातही आपला फॉर्म कायम राखत ११ गुणांची कमाई केली. त्याला अजय कुमारने ३ आणि गुरविंदर सिंहने ३ पॉईंट मिळवत चांगली साथ दिली. मात्र अनुभवी बचावपटूची कमतरता आणि संघातल्या इतर बचावपटूंची साथ न मिळाल्यामुळे त्यांना आजच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

यूपी योद्धाजच्या संघाने मात्र आज अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन केलं. कर्णधार नितीन तोमरने पुन्हा एकदा बंगळुरुच्या कमजोर बचावाचा फायदा घेत, प्रतिस्पर्धी संघाला खिंडार पाडलं. नितीनने आजच्या सामन्यात ९ गुणांची कमाई केली. त्याला मुंबईकर रिशांक देवाडिगाने ५ तर राजेश नरवालने ३ गुण मिळवत चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – यू मुम्बा ठरले दबंग, दिल्लीवर एकतर्फी मात

उत्तर प्रदेशच्या संघाच्या बचावफळीनेही आज आपल्या रेडर्सना चांगली साथ दिली. जीवा कुमार, नितेश आणि पंकज या जोडीने आजच्या सामन्यात बचावात ७ पॉईंट मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बदली खेळाडू सुरिंदर सिंहनेही ३ गुणांची कमाई करत संघाच्या विजयात आपला खारीचा वाटा उचलला.

सामन्यात यूपी योद्गाजने बंगळुरुच्या संघाला एकदा ऑलआऊटही केलं, मात्र याचा दबाव न घेता बंगळुरुने अखेरच्या सत्रात यूपी योद्धाजला चांगली लढत दिली. एकाक्षणी १० गुणांनी आघाडीवर असणारा उत्तर प्रदेशचा संघ आजचा सामना ६ गुणांच्या फरकाने जिंकला. त्यामुळे पराभव पदरी पडूनही आजच्या सामन्यात बंगळुरुच्या पदरात १ गुण मिळाला आहे.