Pro Kabaddi: Puneri Paltan thrash Patna Pirates in semi-finals | Loksatta

प्रो कब्बडी लीग २०२२: माजी चॅम्पियन पटना पायरेट्सचा धुव्वा उडवत पुणेरी पलटण उपांत्य फेरीत

प्रो कब्बडी लीग २०२२च्या सर्वात यशस्वी कर्णधाराने जबरदस्त कामगिरी करून संघाला उपांत्य फेरीत नेले. तीन वेळा माजी चॅम्पियन असलेला पटना पायरेट्सचा संघ या पराभवामुळे बाहेर पडला.

प्रो कब्बडी लीग २०२२: माजी चॅम्पियन पटना पायरेट्सचा धुव्वा उडवत पुणेरी पलटण उपांत्य फेरीत
सौजन्य- प्रो कब्बडी (ट्विटर)

प्रो कब्बडी लीग २०२२च्या १२०व्या सामन्यात पुणेरी पलटणने पटना पायरेट्सचा ४४-३० ने पराभव केला. या सामन्यात संघाचा कर्णधार फझेल अत्राचली याने चमकदार कामगिरी करत आपल्या संघाला थेट उपांत्य फेरीत नेले आहे. तीन वेळा माजी चॅम्पियन पटना पायरेट्स या स्पर्धेतून जवळपास बाहेर पडली असून पुढील फेरीत स्थान मिळवण्याची त्यांची शक्यता कमी आहे.

हैदराबाद येथे सुरू असलेल्या साखळी फेरीचा अखेरच्या काही दिवसांमध्ये सामने चांगलेच उत्कंठावर्धक होताना दिसले. या लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या फाझेल अत्राचलीने या सामन्यात सर्वाधिक ४ गुण घेतले. आकाश शिंदे याने छापा टाकताना १५ गुण घेतले. पटना पायरेट्सकडून सचिन तन्वरने रेडिंगमध्ये १० आणि मोहम्मदरेझा शादुलने बचावात ५ गुण मिळवले.

पूर्वार्धानंतर पुणेरी पलटणने पाटणा पायरेट्सविरुद्ध १९-१० अशी आघाडी घेतली. पुणेरी पलटणने सामन्याची चांगली सुरुवात करून पाटणा पायरेट्सवर दडपण आणले, पण मोनू आणि सचिन तन्वरच्या चढाईमुळे पाटणा पायरेट्सने पुण्याला ऑलआऊटच्या दिशेने ढकलले. पुण्याचे केवळ तीन खेळाडू शिल्लक असताना मोहम्मद नबीबक्षने चढाईत महत्त्वाचा खेळ करत संघाला धोक्यापासून वाचवले. त्यानंतर पुण्याने वेग कायम ठेवला आणि १८व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सला पहिले ऑलआऊट केले. पुणेरी पलटणसाठी आकाश शिंदेने ६ तर सचिन तन्वरने ४ रेड पॉइंट मिळवले. पटनाचा बचाव अजिबात चालला नाही, त्यामुळे पूर्वार्धात संघाचे नुकसान झाले.

पुणेरी पलटणने दुसऱ्या सत्राची शानदार सुरुवात केली आणि आकाश शिंदेने पटना पायरेट्सच्या तीन बचावपटूंना सुपर रेड मारून बाद केले. यासह आकाशने आपला सुपर १० पूर्ण केला आणि पायरेट्सला दुसऱ्या ऑलआऊटच्या दिशेने ढकलले. पाटणा पायरेट्सनेही २४व्या मिनिटाला दुसऱ्यांदा ऑलआऊट केले. पुण्याच्या बचावफळीने जास्त चुका न करता आक्रमक खेळ केला. पुण्याने चमकदारपणे आपली आघाडी कायम ठेवली आणि पटनाला एकही संधी दिली नाही.

हेही वाचा  : FIFA WC 2022: विश्वचषकातील पहिले पेनल्टी शूटआऊट! जपानवर मात करत क्रोएशिया सलग दुसऱ्यांदा क्वार्टर-फायनलमध्ये दाखल

दरम्यान, मोहम्मद इस्माईल नबीबक्षने अप्रतिम सुपर रेड मारत पाटणाच्या ४ बचावपटूंना बाद केले. ३८व्या मिनिटाला पुणेरी पलटणने पाटणा पायरेट्सला तिसऱ्यांदा ऑलआउट केले. शेवटच्या क्षणी पाटणाने पुण्याला ऑलआऊट केले, पण शेवटी पुण्याने हा सामना एकतर्फी जिंकला आणि या सामन्यातून पाटणा पायरेट्सला एकही गुण मिळाला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 10:38 IST
Next Story
पाकिस्तानच्या पराभावाचा भारताला फायदा! World Test Championship च्या अंतिम फेरीचा मार्ग सुखकर; पाहा Points Table