प्रो कबड्डी लीगचा आणखी विस्तार तूर्त कठीण!

कबड्डीची वाटचाल आणि अर्थकारणाबाबत त्यांच्याशी केलेली खास बातचीत-

(संग्रहित छायाचित्र)

अनुपम गोस्वामी, प्रो कबड्डी लीगचे कमिशनर

प्रशांत केणी

इंग्लिश प्रीमियर लीग, चॅम्पियन्स लीग आणि ला लिगा या फुटबॉल लीगच्या धर्तीवर प्रो कबड्डी लीगचा विस्तार करून ती सहा महिन्यांची करणे शक्य होते; परंतु कबड्डीपटूंना इतक्या रजा मिळू शकणार नाहीत आणि देशात कबड्डीसाठीच्या विशेष मैदानांचा अभाव असल्यामुळे सध्या तरी हे पाऊल उचलता येणार नाही, असे स्पष्टीकरण प्रो कबड्डी लीगचे लीग कमिशनर अनुपम गोस्वामी यांनी दिले आहे. प्रो कबड्डीची वाटचाल आणि अर्थकारणाबाबत त्यांच्याशी केलेली खास बातचीत-

* प्रो कबड्डीच्या गेल्या दोन हंगामांतील लिलावात आकडे दीड कोटींच्या पलीकडे गेले आहेत. या अर्थकारणाचे तुम्ही कसे काय विश्लेषण कराल?

प्रो कबड्डी ही भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची लोकप्रिय लीग आहे. कोणत्याही स्पर्धा किंवा लीगमधील खेळाडूंना मुख्य प्रवाहात कोणते स्थान मिळते, हे महत्त्वाचे असते. क्रिकेट, बॅडमिंटन यांच्यासारख्या खेळांमध्ये आपल्याकडे विश्वविजेते आहेत; परंतु काही खेळांमधील खेळाडूंना स्वीकारण्यास नागरिकांना अधिक वेळ लागतो. त्यामुळे खेळाडूचे मानधन किंवा लीगमधील खेळाडूची बोली हीसुद्धा महत्त्वाची असते. त्यानुसार प्रो कबड्डीत खेळाडूंचे अर्थकारण उंचावणारा कोटय़वधीचा आकडा हा विक्रमी मानायला हवा. अन्य खेळांची तुलना केल्यास तिथे ६०-७० लाख ही बोलीसुद्धा सन्माननीय मानली जाते. प्रो कबड्डीमधील सर्वात तळाच्या श्रेणीमधील म्हणजे नव्या युवा खेळाडूंना साडेसहा लाख रुपये मानधन दिले जाते. कोणत्याही क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी हा पगार प्राप्त करण्यासाठी पाच वर्षे जावी लागतात. त्यामुळे प्रो कबड्डीतील खेळणाऱ्या खेळाडूला मिळणाऱ्या मानधनाचा अभिमान वाटतो. फ्रेंचायझीच्या अर्थकारणासाठी प्रत्येक दुसऱ्या हंगामाला १० टक्के एकूण लिलाव रक्कम वाढवण्याचे धोरण आम्ही निश्चित केले आहे. त्यामुळे संघांना योजना आखता येतात.

* आता सातव्या हंगामाच्या उत्तरार्धात येऊन पोहोचलेल्या प्रो कबड्डी लीगने देशात कशा प्रकारे परिवर्तन घडवले आहे?

पहिल्या हंगामात १२.८० लाख ही सर्वाधिक बोली होती, ती आता दीड कोटींपर्यंत उंचावली आहे.  प्रो कबड्डी सुरू होण्याआधी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला किंवा सरकारी नोकरी मिळवणाऱ्याला मोठा खेळाडू मानले जायचे. हे चित्रच पालटून गेले आहे. यंदाच्या हंगामासाठीच्या लिलावात २५० कबड्डीपटूंवर बोली लागली. म्हणजे व्यावसायिक खेळाडूंची संख्या ही झपाटय़ाने वाढत गेली आहे. सार्वजनिक क्षेत्रांमधील कंपन्यांमध्ये खेळाडू भर्ती प्रक्रिया जवळपास बंद झाली होती. त्या प्रक्रियेला प्रो कबड्डीमुळे संजीवनी मिळाली आहे.

* प्रो कबड्डीची आता तीन महिन्यांची विस्तारित लीग खेळवली जाते. परदेशांमधील फुटबॉल लीगच्या धर्तीवर त्याची वाटचाल सुरू आहे का?

लीगचा विस्तार करण्याचे धोरण आम्ही आखले, तेव्हा अनेकांनी त्याबाबत आक्षेप घेतला होता. खेळाडू इतका काळ खेळू शकतील का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले; परंतु आता त्यांना योग्य उत्तरे मिळाली आहेत. स्पर्धेचा दर्जा उंचावण्यासाठी खेळाडूंचा पुरवठा वाढवायला हवा. त्यामुळे १२ संघांची लीग केली. खेळाडू आठवडय़ातून तीन-चार दिवस खेळले, तर ही लीग ९३ दिवसांऐवजी सहा महिन्यांचीसुद्धा करता येऊ शकते; परंतु भारतात क्रिकेट वगळल्यास अन्य खेळांमधील खेळाडूंच्या मोठय़ा प्रमाणात नोकऱ्या या सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रांमधील कंपन्यांमध्ये असल्याने त्यांना एवढी मोठी सुटी मिळू शकणार नाही, ही यामागील महत्त्वाची अडचण आहे. परदेशांमधील फुटबॉल लीगमधील संघांचे स्वत:चे स्टेडियम आहेत. त्यामुळे वार्षिक कार्यक्रम पत्रिका आखून सामन्यांचे समीकरण तयार केले जाते; परंतु कबड्डीसाठीच्या खास स्टेडियमचा अभाव, ही त्याच्या दीर्घविस्तारामधील दुसरी मोठी अडचण आहे. परंतु आता देशात प्रो कबड्डी वगळल्यास फार थोडय़ा प्रमाणात व्यावसायिक दर्जाचा कबड्डी खेळ पाहायला मिळतो, हे वास्तव आहे.

* २०१६ मध्ये विश्वचषक कबड्डी स्पर्धा झाली होती. पुढील स्पर्धा कधी होईल?

प्रो कबड्डीचे आयोजन मशाल स्पोर्ट्स करते, तर विश्वचषकाचे भारतीय हौशी कबड्डी महासंघ करते.अहमदाबादला झालेल्या विश्वचषकासंदर्भातील संयोजनाच्या बऱ्याच जबाबदाऱ्या आम्ही पार पाडल्या होत्या. त्यामुळे संघटनेने तारखा निश्चित केल्यावर आम्ही दर्जेदार स्पर्धेसाठी त्यांना साह्य़ करू.

* महिला कबड्डीचे लीग किंवा आंतरराष्ट्रीय भवितव्य काय?

आम्हाला महिलांसाठीसुद्धा कबड्डी लीग आयोजित करायची आहे. त्याच उद्देशाने महिला कबड्डी चॅलेंज हा प्रयोग केला होता. त्यामुळे योग्य तयारी झाल्यानंतर महिलांची प्रो कबड्डीसुद्धा ताकदीने आम्ही मैदानावर आणू.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pro kabaddi league anupam goswami interview abn

ताज्या बातम्या