प्रो-कबड्डी या स्पर्धेने काही वर्षांच्या कालावधीमध्येच, क्रीडा रसिकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. Google च्या Year in Search 2019 या अहवालात, प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळालेल्या खेळांच्या यादीत प्रो-कबड्डी दुसऱ्या स्थानी आहे. २०१९ साली इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेला आणि त्यासंदर्भातील घडामोडी Google वर जास्त वाचल्या गेल्या.

क्रिकेट विश्वचषक आणि प्रो-कबड्डी या स्पर्धांपाठोपाठ, भारतीय क्रीडा रसिकांनी विम्बल्डन, कोपा अमेरिका, ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन, Super Bowl, अ‍ॅशेस आणि यूएस ओपन या स्पर्धांना आपली पसंती दिली आहे.

अवश्य वाचा – ऑलिम्पिक महासंघाकडून शस्त्र म्यान, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सहभागी होणार

२०१४ साली प्रो-कबड्डीचा पहिला हंगाम खेळवण्यात आला. या हंगामानंतर स्पर्धेला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळत गेली. २०१९ साली प्रो-कबड्डीच्या प्रेक्षकसंख्येत ९ टक्क्यांनी वाढ झाली होती. सातव्या हंगामाच्या अंतिम फेरीत बंगाल वॉरियर्स संघाने दबंग दिल्ली संघावर मात केली होती. भारतीय खेळाडूंसोबत, इराण, दक्षिण कोरिया, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशातील खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होतात.