यू मुंबा संघाचे लक्षवेधी बचतधोरण

करोनाच्या साथीमुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाच्या लिलावातील अर्थकारणात ५.२८ टक्क्यांनी माफक घसरण पाहायला मिळाली. याचप्रमाणे संघ निवडप्रक्रियेच्या खर्चात यू मुंबा संघाने उत्तम बचतधोरण राबवले.
मुंबईत तीन दिवस झालेल्या लिलावात १९०हून अधिक कबड्डीपटूंवर १२ संघांनी ४८ कोटी, २२ लाख रुपयांची गुंतवणूक केली. एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाच्या लिलावात १२ संघांनी २०० कबड्डीपटूंवर ५० कोटी, ९१ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यामुळे यंदाच्या लिलावाचे अर्थकारण २.६९ कोटी रुपयांनी घसरले आहे. येत्या हंगामासाठी जयपूर पिंक पँथर्स आणि तेलुगू टायटन्स यांनी सर्वाधिक प्रत्येकी ४ कोटी, २२ लाखांची गुंतवणूक केली, तर यू मुंबाने सर्वात कमी ३ कोटी, ७७ लाख गुंतवून ६३ लाख रुपये वाचवले आहेत. यू मुंबाने मागील लिलावाच्या तुलनेतही ५४ लाख कमी गुंतवले. तमिळ थलायव्हाज आणि पाटणा पायरेट्स यांनीही अनुक्रमे ४३ आणि ३७ लाखांची बचत केली.
आठव्या हंगामाच्या लिलावात ‘एफबीएम’ कार्डाचा वापर करून म्हणजेच अंतिम बोली निश्चित झाल्यावर विशेष कार्ड वापरून १० खेळाडूंना संघांनी कायम ठेवले. सातव्या हंगामात ही संख्या १५ पर्यंत होती.