मातीतला खेळ असलेल्या कबड्डीला नवा आयाम देण्याचा प्रयत्न म्हणजे ‘प्रो कबड्डी लीग’ स्पर्धा. इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेचा दुसरा महत्त्वाचा टप्पा मंगळवारी होणार आहे. मंगळवारी या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. आठ फ्रँचायजी संघ लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार असून, १३ विविध देशांतील मिळून ९६ खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
खेळाडूंचा लिलाव करणाऱ्या कार्यक्रमांचे ख्यातनाम सूत्रसंचालक बॉब हेटन यांना लिलाव प्रक्रियेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, जयपूर, कोलकाता, मुंबई, पुणे व विशाखापट्टणम हे आठ फ्रँचायजी आपल्या संघात कबड्डीपटूंना करारबद्ध करण्यासाठी बोली लावणार आहेत.
प्रत्येक संघात १२ खेळाडूंचा समावेश असेल. खेळाडूंच्या याआधीच्या कामगिरीच्या आधारे ९६ खेळाडूंची ‘अ’, ‘ब’, ‘क’ अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. चढाया करणारे खेळाडू, बचावरक्षक, अष्टपैलू आदी शैलीप्रमाणेही खेळाडूंची वर्गवारी होईल.
या स्पर्धेचा सलामीचा सामना २६ जुलैला होणार आहे. प्रत्येक फ्रँचायजीच्या शहरांमध्ये स्पर्धेचे सामने आयोजित केले जाणार आहेत. प्रत्येक संघ प्रत्येकाशी दोन वेळा सामने खेळणार आहे. बाद फेरीचे सामने २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान बंगळुरू येथे होतील.