प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात यजमान हरयाणा स्टिलर्सने दणक्यात सुरुवात केली आहे. आपल्या घरच्या मैदानावर हरयाणाने गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाचा 32-25 ने पराभव केला. नवीन कर्णधार मोनू गोयतचं दमदार पुनरागमन व त्याला इतर खेळाडूंनी दिलेली साथ हे हरयाणाच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. गुजरातच्या चढाईपटूंनीही सामन्यात तोडीस तोड खेळ केला, मात्र त्यांना बचावपटूंची साथ मिळाली नाही.

मोनू गोयत आणि कुलदीप सिंह या खेळाडूंनी पहिल्या सत्रापासून सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं. आक्रमक चढाया करत दोन्ही खेळाडूंनी गुजरातच्या बचावफळीमध्ये खळबळ माजवली. मोनू आणि कुलदीप यांनी चढाईत 7 गुणांची कमाई केली. यांना नवीन व इतर बचावपटूंनीही तितकीच मोलाची साथ दिली. गुजरातकडून प्रपंजन आणि सचिन तवंर यांनी चढाईत चांगल्या गुणांची कमाई केली. मात्र आजच्या सामन्यात गुजरातची बचावफळी पुरती अपयशी ठरली. याचा फायदा घेत हरयाणाने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखत 32-25 अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं.