प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात मुंबईच्या NSCI मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात गतविजेत्या पाटणा पायरेट्स संघाने बंगाल वॉरियर्सवर ५०-२३ ने मात केली आहे. चढाईपटू आणि बचावफळीतल्या खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर पाटण्याने सामन्यात बाजी मारली. या विजयासह गतविजेत्या पाटणा पायरेट्सच्या गुणतालिकेतील स्थानात फारसा फरक पडणार नसला तरीही स्पर्धेतलं त्यांचं आव्हान कायम राहणार आहे. पाटण्याकडून चढाईत प्रदीप आणि दिपक नरवालने चढाईत अनुक्रमे १३ व ११ गुणांची कमाई करत ‘सुपर १०’ ची कमाई केली.

सुरुवातीच्या सत्रात पाटणा आणि बंगाल हे दोन्ही संघ एकमेकांना मोठी आघाडी घेऊ देत नव्हते. १२ व्या मिनीटापर्यंत पाटणा पायरेट्स सामन्यात ७-६ ने आघाडीवर होतं. यानंतर पाटण्याच्या दिपक नरवालने चढाईत २ गुणांची कमाई करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर पाटण्याच्या खेळाडूंनी सामन्यात मागे वळून पाहिलं नाही. प्रदीप नरवाल – दीपक नरवाल या जोडीने आक्रमक चढाया करत बंगालला धक्का दिला. पहिल्या सत्रात पाटणा पायरेट्सच्या बचावफळीनेही काही चांगल्या पकडी गेल्या. बंगालच्या जँग कून ली आणि मणिंदर सिंहला फारशी चमक दाखवता आली नाही. यानंतर लगेचच पाटण्याने बंगालला सर्वबाद करुन सामन्यात मोठी आघाडी घेतली. अखेरच्या सत्रात बंगालच्या खेळाडूंनी प्रदीप नरवालसह काही खेळाडूंच्या चांगल्या पकडी केल्या. मात्र आपल्या संघाची पिछाडी भरुन काढण्यात त्यांना यश आलं नाही. पहिल्या सत्राअखेरीस पाटणा पायरेट्सने २२-१४ अशी भक्कम आघाडी घेतली होती.

पहिल्या सत्रात ८ गुणांनी पिछाडीवर पडलेला बंगालचा संघ दुसऱ्या सत्रातही आपली छाप पाडू शकला नाही. बचावपटूंनी क्षुल्लक चुका करत पाटणा पायरेट्सला गुण देण्याचा सपाटा सुरुच ठेवला. त्यातच दुसऱ्या सत्रात पाटणा पायरेट्सच्या बचावपटूंनी बंगालच्या उरलेल्या खेळाडूंची सफाईपणे पकड करत बंगालला सामन्यात दुसऱ्यांचा सर्वबाद केलं. पाटण्याकडून बचावफळीत जयदीप, विकास काळे, कुलदीप सिंह आणि रविंदर कुमार यांनी संघाला आघाडी मिळवून देण्यात चांगला वाटा उचलला. पाटण्याच्या या आक्रमक खेळापुढे बंगालचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही अखेर ५०-२३ च्या फरकाने गतविजेत्या पाटणा पायरेट्सने सामन्यात बाजी मारत आपलं आव्हान कायम राखलं आहे.