प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वातील इंटर झोन चॅलेंज स्पर्धेत यू मुम्बाने तेलगू टायटन्सवर एकतर्फी मात करत दमदार पुनरागमन केलं आहे. पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात यू मुम्बाने तेलगूवर 41-20 अशी मात केली. मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने चढाईत 17 गुणांची कमाई करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. तेलगू टायटन्सकडून राहुल चौधरीने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ लाभली नाही. सामन्याच्या पहिल्या सत्रापासूनच यू मुम्बाने आपलं वर्चस्व कायम राखलं. सिद्धार्थ देसाईने तेलगू टायटन्सच्या बचावफळीला खिंडार पाडलं. आजच्या सामन्यात तेलगू टायटन्सने उजवा कोपरारक्षक अबुझार मेघानी ऐवजी सोमबीरला जागा दिली होती. मात्र सोमबीरने आज पुरती निराशा केली, तेलगू टायटन्सच्या या कच्च्या दुव्याचा फायदा घेत सिद्धार्थ देसाईने खोऱ्याने गुणांची कमाई केली. संपूर्ण सामन्यात यू मुम्बा तेलगू टायटन्सला 3 वेळा सर्वबाद करु शकली. सिद्धार्थला चढाईमध्ये अबुफजल मग्शदुलूने 2 तर दर्शन कादीयानने 3 गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. यू मुम्बाकडून बचावफळीत कर्णधार फजल अत्राचलीने 4 तर सुरिंदर सिंह-विनोद कुमार-रोहित राणाने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. उजवा कोपरारक्षक अबुझार मेघानीचं संघात नसणं आजच्या सामन्यात तेलगू टायटन्सला चांगलंच भोवलं. त्यातच राहुल चौधरीचा अपवाद वगळता एकही खेळाडू आपली छाप पाडू शकला नाही. भरवाशाच्या निलेश साळुंखेनेही आज निराशा केली. याचसोबत बचावफळीतही विशाल भारद्वाजद व अन्य खेळाडूंनी यू मुम्बाला गुण बहाल केले. त्यामुळे तेलगू टायटन्सचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. दरम्यान राहुल चौधरीने प्रो-कबड्डीच्या इतिहासात 700 गुणांचा टप्पा पार केला. अवश्य वाचा - Pro Kabaddi Season 6 : दिग्गजांना मागे टाकून यू मुम्बाचा मराठमोळा सिद्धार्थ देसाई ठरला सरस