घरच्या मैदानावर सलग दोन पराभवाचां सामना करावा लागल्यानंतर यू मुम्बाने अखेर विजयाची चव चाखली. इंटर झोन चॅलेंज स्पर्धेत खेळताना यू मुम्बाने युपी योद्धा संघावर ४१-२४ ने मात केली. सिद्धार्थ देसाईच्या आक्रमक चढाया आणि बचावपटूंची धडाकेबाज कामगिरी या जोरावर यू मुम्बाने उत्तर प्रदेशचं आव्हान परतवून लावलं. उत्तर प्रदेशच्या बचावपटूंनीही आजच्या सामन्यात चांगली कामगिरी केली, मात्र चढाईपटूंना आपल्या लौकिकाला साजेसा खेळ न करता आल्यामुळे उत्तर प्रदेशला सामना गमवावा लागला. घरच्या मैदानात दोन सामने गमवावे लागल्यानंतर यू मुम्बाने इंटर झोन चॅलेंज स्पर्धेत सावध सुरुवात केली. पहिल्या सत्रातली सुरुवातीची काही मिनीटं दोन्ही संघ बरोबरीत खेळत होते. यू मुम्बाकडून सिद्धार्थ देसाईने चढाईत काही गुणांची कमाई केली, मात्र दुसऱ्या बाजूने त्याला दर्शन कादीयान म्हणावी तशी साथ देऊ शकला नाही. मात्र दुसरीकडे यू मुम्बाच्या बचावफळीने सुरिंदर सिंह, धर्मराज-विनोद-फजल अत्राचली या बचावफळीने महत्वाचे गुण मिळवत आपल्या संघाचं आव्हान कायम राखलं. बचावफळीच्या याच खेळाच्या जोरावर मुम्बाने उत्तर प्रदेशला बाद करत सामन्यात पहिल्यांदा १५-१४ अशी आघाडी घेतली. ही आघाडी सामन्याच्या मध्यांतरापर्यंत कायम राहिली. उत्तर प्रदेशकडून पहिल्या सत्रात नरेंद्र, सचिन आणि जीवा कुमार यांनी बचावफळीत अष्टपैलू खेळ केला. मात्र चढाईत प्रशांत कुमार राय, कर्णधार रिशांक देवाडीगा चढाईत आपली छाप पाडू शकले नाहीत. दुसऱ्या सत्रातही यू मुम्बाच्या बचावपटूंनी आपला धडाकेबाज खेळ कायम ठेवला. रिशांक, प्रशांत राय यांच्या पकडी करत मुम्बाने उत्तर प्रदेशला बॅकफूटवर ढकललं. सिद्धार्थ देसाईवर नियंत्रण ठेवणं उत्तर प्रदेशच्या एकाही खेळाडूला जमलं नाही. अखेर दुसऱ्या सत्रातही उत्तर प्रदेशला ऑलआऊट करत मुम्बाने २५-२५ अशी १० गुणांची आघाडी घेतली. उत्तर प्रदेशकडून चढाईमध्ये श्रीकांत जाधवने एकाकी झुंज देत काही गुणांची कमाई केली. मात्र कोर्टमध्ये ३ खेळाडू शिल्लक असताना यू मुम्बाने श्रीकांत जाधवचं सुपर टॅकल करत आपली आघाडी अजुन वाढवली. दर्शन कादीयानने चढाईत आणखी दोन गुणांची कमाई करत संघावरचं संकट टाळलं. सामन्यात ५ पेक्षा कमी मिनीटांचा खेळ शिल्लक असताना दर्शन कादीयानने एकाच चढाईत ५ गुणांची कमाई करत उत्तर प्रदेशला तिसऱ्यांदा ऑलआऊट केलं. या खेळीनंतर मुम्बाने सामन्यात ३६-२१ अशी अभेद्य आघाडी घेतली. यानंतर उत्तर प्रदेशचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. अखेर यू मुम्बाने सामन्यात ४१-२४ ने बाजी मारुन घरच्या मैदानावर आपल्या पराभवाची हॅटट्रीक रोखली.