Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाचं आव्हान संपुष्टात ! यूपी योद्धाची सामन्यात बाजी

यूपीच्या बचावफळीसमोर यू मुम्बा गारद

प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वातील बाद फेरीत पहिल्या सामन्यात आज धक्कादायक निकालाची नोंद करण्यात आली. अ गटात संपूर्ण साखळी सामन्यात अव्वल राहिलेल्या यू मुम्बाचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. यूपी योद्धाने यू मुम्बाचं आव्हान ३४-२९ ने परतवून लावत अंतिम फेरीसाठीच्या आपल्या आशा पल्लवीत ठेवल्या आहेत. यू मुमबाच्या चढाईपटूंचा अभ्यास करुन आखलेल्या उत्कृष्ट बचावाच्या जोरावर यूपी योद्धाने सामन्यात बाजी मारली.

पहिल्या सत्रात सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये दोन्ही संघ बरोबरीत खेळत होते. मात्र काही कालावधीनंतर यूपी योद्धाजच्या बचावपटूंनी शिस्तबद्ध खेळ करत यू मुम्बाच्या चढाईपटूंना आपलं शिकार बनवायला सुरुवात केली. सिद्धार्थ देसाई, रोहित बालियान, दर्शन कादियान या खेळाडूंना यूपीच्या संघाने सतत बाहेर बसवलं. अवघ्या काही मिनीटांमध्ये यू मुम्बाला सर्वबाद करण्यात उत्तर प्रदेशचा संघ यशस्वी झाला. मात्र वेळेतच स्वतःला सावरत यू मुम्बाने सामन्यात पुनरागमन केलं. मध्यांतराला यू मुम्बाने उत्तर प्रदेशला १८-१५ अशी ३ गुणांची आघाडी घेऊ दिली.

मात्र दुसऱ्या सत्रात उत्तर प्रदेशने संपूर्णपणे खेळाची सुत्र आपल्या हाती घेतली. नितेश कुमारने उजव्या कोपऱ्यावर खेळताना एकामागोमाग एक गुण घेण्याचा सपाटा सुरु ठेवला. दुसऱ्या सत्रातही यू मुम्बाच्या चढाईपटूंनी क्षुल्लक चुका करत उत्तर प्रदेशच्या बचावफळीला गुण बहाल केले. अखेरच्या काही मिनीटांमध्ये अभिषेक सिंह आणि सिद्धार्थ देसाईने चढाईत गुण घेत झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सामना यू मुम्बाच्या हातून निसटला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व pro kabaddi league बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pro kabaddi 2018 season u mumba campaign comes to an end as up yoddha advance to next round

ताज्या बातम्या