प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात अंतिम फेरीत गुजरात फॉर्च्युनजाएंट आणि बंगळुरु बुल्स या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. मुंबईच्या NSCI मैदानात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने यूपी योद्धा संघावर ३८-३१ ने मात करत अंतिम फेरीतलं आपलं स्थान निश्चीत केलं आहे.

पात्रता फेरीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या यूपी योद्धा संघाची गुजरातसमोर डाळ शिजू शकली नाही. सचिन तवंर, के. प्रपंजन यांच्या आक्रमक चढायांमुळे मोक्याच्या क्षणी गुजरातने सामन्यात आघाडी घेतली. त्यांना बचावफळीत हादी ओश्तनोक, सुनील कुमार, परवेश भैंसवाल, सचिन विट्टला यांनी चांगली साथ दिली. उत्तर प्रदेशकडून श्रीकांत जाधव आणि प्रशांत कुमार राय यांनी चांगले गुण कमावले. मात्र कर्णधार रिशांक देवाडीगाला आज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे पहिल्या सत्राच्या अखेरीस गुजरातने १९-१४ अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रामध्ये मात्र गुजरातने सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटलं. उत्तर प्रदेशच्या चढाईपटूंची सफाईदारपणे पकड करत गुजरातने आपली आघाडी वाढवली. सामना संपायला अवघी काही मिनीटं शिल्लक असताना गुजरात सहज विजयी होईल असं वाटत असताना उत्तर प्रदेशने सामन्यात कमबॅक केलं. श्रीकांत जाधव आणि प्रशांत कुमार राय यांनी गुजरातच्या संघाला सर्वबाद करण्यात यश मिळवलं. मात्र मोक्याच्या क्षणी उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनी क्षुल्लक चुका करत गुजरातला सामना बहाल केला. अखेर ३८-३१ च्या फरकाने गुजरातने सामन्यात बाजी मारली. ५ जानेवारी रोजी गुजरात आणि बंगळुरु यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.