डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामासाठी २९ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत महालिलावाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी घोषणा गुरुवारी संयोजकांकडून करण्यात आली.

करोनाच्या साथीमुळे दोन वष्रे प्रो कबड्डीचे आयोजन करण्यात आले नव्हते. परंतु यंदा प्रो कबड्डीच्या आयोजनासाठी करोनाच्या शिष्टाचारांचे पालन करून लिलाव होणार आहे. या लिलावात देश-विदेशातील अनुभवी आणि नव्या खेळाडूंना अ, ब, क आणि ड अशा चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. यात अष्टपैलू, बचावपटू, आक्रमक अशा उपविभागांचा समावेश करण्यात आला आहे. संघबांधणीसाठी प्रत्येक संघाकडे चार कोटी, ४० लाख रुपये रक्कम उपलब्ध असेल. या लिलावाआधी सर्व संघांना सातव्या हंगामातील खेळाडू कायम ठेवण्याची संधी देण्यात येईल. प्रत्येक संघाला सहा नामांकित खेळाडू कायम ठेवता येतील.

प्रो कबड्डी लीगच्या लिलावाची कबड्डी क्षेत्रातील आम्ही सर्वच जण आतुरतेने प्रतीक्षा करीत होतो. कबड्डीपटू तंदुरुस्ती आणि कौशल्यासह आगामी हंगामासाठी सज्ज आहेत. लिलावामधील युवा गुणवत्तेकडे सर्व संघांचे लक्ष असेल. सर्वच संघ व्यवस्थापन या लिलावात तयारीनिशी उतरतील, याची मला खात्री आहे.

-अनुप कुमार, पुणेरी पलटण संघाचा प्रशिक्षक

गट    मूळ किंमत

अ     ३० लाख

ब      २० लाख

क     १० लाख

ड      ६ लाख