scorecardresearch

कर्णधाराचा अतिआत्मविश्वास आम्हाला नडतोय!

अजय ठाकूरवर प्रशिक्षक भास्करन यांची टीका

गुजरातविरुद्ध सामना संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना तामिळ थलायवाजचे प्रशिक्षक भास्करन
गुजरातविरुद्ध सामना संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना तामिळ थलायवाजचे प्रशिक्षक भास्करन

प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाल्यानंतर अनेक नवोदीत खेळाडूंनी आपला ठसा सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये उमटवला. मात्र गेली ४ पर्व प्रो-कबड्डी गाजवणारे काही खेळाडू यंदाच्या पर्वात सपशेल अपयशी ठरतायत. कबड्डी विश्वचषकात ईराणविरुद्ध भारताला सामना जिंकवून देणारा अजय ठाकूर यंदाच्या पर्वात तामिळ थलायवाज संघाकडून खेळतो आहे. तुलनेने नवीन खेळाडूंना घेऊन मैदानात उतरलेल्या अजयला यंदाच्या पर्वात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. काल गुजरातविरुद्धच्या सामन्यात याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला. संपूर्ण सामन्यात अजयला केवळ १ पॉईंट मिळवता आला. आपला कर्णधार संघात योग्य पद्धतीने खेळत नसल्याचं दिसताच प्रशिक्षक भास्करन यांनी अजय ठाकूरला मैदानातून बाहेर काढलं.

हरियाणा स्टिलर्सविरुद्ध सामना बरोबरीत सुटल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भास्करन यांनी अजय ठाकूरच्या खेळाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. “अजय ठाकूरसारखा खेळाडू मैदानात अतिआत्मविश्वासाने खेळतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाचे बचावपटू त्याला सहज बाद करतात. संघात कर्णधारपदाबद्दल कोणतेही वाद नाहीत, मात्र सामन्यात चढाई करत असताना, अजय ठाकूरला असं वाटतं की आपण हमखास पॉईंट मिळवू. त्याचा हाच अतिआत्मविश्वास त्याला नडतोय. त्याच्या या खेळावर आपण प्रशिक्षक म्हणून अजिबात खूश नसल्याचंही”, भास्करन यांनी बोलून दाखवलं.

काल झालेल्या सामन्यात तामिळ थलायवाजचा संघ एका क्षणापर्यंत १३-१० अशा आघाडीवर होता. मात्र के.प्रपंजनचा अपवाद वगळता तामिळ थलायवाजच्या एकाही खेळाडूने चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं नाही. याचा फायदा घेत हरियाणाचा संघ सामन्यात परतला. विकास कंडोलाला शेवटच्या काही रेडमध्ये तामिळच्या बचावपटूंविरोधात पॉईंट मिळवता आले नाहीत, आणि म्हणून हा सामना बरोबरीत सुटल्याचं भास्करन म्हणाले.

लिलावाच्या दरम्यान अनुभवी खेळाडूंना सोडून नवीन खेळाडूंना घेतल्याबद्दल सुरुवातीला भास्करन यांच्यावर टीका झाली होती. मात्र यापाठीमागे आपला विचार भास्करन यांनी स्पष्ट केला, “नवीन खेळाडूंना डावपेच शिकवून मैदानात उतरवणं मला जास्त योग्य वाटलं. जे खेळाडू तरबेज झाले आहेत, त्यांनी आपापली शैली विकसीत केली आहे. त्यामुळे नवीन संघात त्यांची शैली बदलणं, त्यांना नवीन डावपेच शिकवणं हे माझ्यासाठी जिकरीचं काम होतं. त्यामुळे मी नवोदीत खेळाडूंवर आपला भरवसा दाखवला. ज्यावेळी अजय ठाकूर मैदानात चांगली कामगिरी करत नाहीये, त्यावेळी प्रपंजन आणि ली यांना संधी देण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता”, असंही भास्करन म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-08-2017 at 17:28 IST

संबंधित बातम्या