प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वातील नवी दिल्लीच्या त्यागराज मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या इंटर झोन स्पर्धेत, तामिळ थलायवाजने गुजरातच्या संघावर मात केली. गुणतालिकेत सर्वात तळाशी असलेल्या तामिळ थलायवाजने एका गुणाच्या फरकाने विजय संपादीत करत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरातच्या संघाला धक्का दिला. याआधीही तामिळ थलायवाजने बंगाल वॉरियर्सवर शेवटच्या क्षणांमध्ये मात केली होती. एका क्षणी सामन्यात ११ गुणांनी आघाडीवर असणारा गुजरातचा संघ, अचानक तामिळ थलायवाजच्या आक्रमणापुढे हतबल दिसायला लागला.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – गुजरातला पराभवाचा धक्का, थरारक सामन्यात तामिळने केली मात

या पराभवाने गुजरातच्या स्थानावर फारसा फरक पडणार नसला, तरीही प्रशिक्षक मनप्रीत सिंह यांनी या पराभवासाठी पंचांना दोषी ठरवलं आहे. सामना संपायला ४ मिनीट शिल्लक असताना गुजरातच्या संघाकडे ३४-२३ अशी ११ गुणांची आघाडी होती. मात्र तामिळ थलायवाजने चढाई करत गुजरातच्या बचावफळीला खिंडार पाडलं. या आक्रमणामुळे गुजरातचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. “सामना संपायला दोन मिनीटं शिल्लक असताना आम्ही बदली खेळाडूला मैदानात उतरवण्याची मागणी केली होती. मात्र पंचांनी त्याच्याकडे लक्ष न देता अजयला चढाई करण्याची संधी दिली. त्यामुळे एका खेळाडूला बाद करुन सामन्यात बरोबरी साधणं तामिळ थलायवाजच्या संघाला यश आलं.” गुजरातचे प्रशिक्षक मनप्रीत सिंह यांनी पंचांच्या कामगिरीवर आपली नाराजी व्यक्त केली.

गुजरातच्या संघाचा उजवा कोपरारक्षक फजल अत्राचलीने आपल्या संघाच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त केलं. “मी आणि सुकेश हेगडे यांना प्रो-कबड्डी खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे इतर खेळाडू अटीतटीच्या सामन्यात दबाव असताना आपल्यावर नियंत्रण ठेऊ शकत नाही. याचाच आम्हाला कालच्या सामन्यात फटका बसल्याचं”, फजलने बोलून दाखवलंय. मात्र एखाद्या स्पर्धेत अशा घडामोडी होत असतात. कधी तुम्हाला विजय मिळतो तर कधी पराभव पदरी पडतो. अजुनही आमचा संघ स्पर्धेत चांगला खेळ करतोय. त्यामुळे पुढच्या सायमन्यात या चुका सुधारत आम्ही याहून चांगला खेळ करु, असं म्हणत फजलने आपल्या संघाची बाजू सावरुन धरली. गुजरातचा पुढचा सामना गतविजेत्या पाटणा पायरेट्सविरुद्ध होणार आहे. त्यामुळे या सामन्यात गुजरातचा संघ कशी कामगिरी करतोय हे पहावं लागणार आहे.