कर्णधार अजय ठाकूरने शेवटच्या सेकंदापर्यंत केलेल्या चित्तथरारक खेळामुळे सलग दुसऱ्या सामन्या तामिळ थलायवाजने आपल्या प्रतिस्पर्धी संघावर निसटता विजय मिळवला आहे. इंटर झोन स्पर्धेत गुजरातच्या संघाविरुद्ध खेळताना पिछाडी भरुन काढत तामिळ थलायवाजने ३५-३४ असा एका गुणाच्या फरकाने विजय संपादीत केला. याआधी तामिळ थलायवाजने बंगाल वॉरियर्स संघाला अशाच प्रकारे अटीतटीच्या सामन्यात हरवलं होतं.

तामिळ थलायवाजकडून आजच्या सामन्याचा हिरो ठरला तो कर्णधार अजय ठाकूर. चढाईत तब्बल १४ गुणांची कमाई करत अजयने अखेरच्या सेकंदापर्यंत आपलं आव्हान कायम ठेवलं. दुसऱ्या सत्रात अजय ठाकूरने केलेल्या मॅरेथॉन रेडच्या जोरावर तामिळने पिछाडी भरुन काढत, सामन्यातील शेवटच्या चढाईत गुजरातच्या हाताशी आलेला विजय खेचून घेत तामिळ थलायवाजने सामन्यात बाजी मारली. अखेरच्या क्षणी दबावाखाली आलेल्या गुजरातच्या संघाने बचावात केलेल्या क्षुल्लक चुका तामिळ थलायवाजच्या चांगल्याच पथ्यावर पडल्या.

अजय ठाकूरव्यतिरीक्त तामिळ थलायवाजकडून के.प्रपंजनने ९ गुणांची कमाई करत अजय ठाकूरला तोलामोलाची साथ दिली. त्यांना बचावफळीतल्या खेळाडूंनीही आपापल्यापरीने सर्वोत्तम खेळ करत साथ दिली.

गुजरातने पहिल्यापासून या सामन्यावर वर्चस्व ठेवलं होतं. युवा खेळाडू सचिन तवंरने चढाईत ११ गुणांची कमाई करत आपल्या संघाची आघाडी वाढवली. त्याला चंद्रन रणजीतने ५ तर कर्णधार सुकेश हेगडेने ३ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. बचावफळीतही फजल अत्राचली आणि अबुझार मेघानीने चांगल्या गुणांची कमाई करत आपल्या संघाची आघाडी वाढवण्यात मोलाचा हातभार लावला.

मात्र तामिळ थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूरने अखेरच्या सत्रात केलेल्या आक्रमक चढायांमुळे गुजरातची बचावफळी चांगलीच बिथरली. त्यातचं मोक्याच्या क्षणी फजलला संघाबाहेर बसवण्यात तामिळ थलायवाजच्या संघाला यश आलं. सामन्याच्या अखेरच्या चढाईत एका गुणाने पिछाडीवर असताना अजय ठाकूरने गुजरातच्या दोन बचावपटूंना बाद करत सामना अनपेक्षितपणे आपल्या बाजूने फिरवला.

या विजयामुळे तामिळ थलायवाजच्या गुणतालिकेतील स्थानावर कोणताही परिणाम झालेला नाहीये. मात्र गुजरातने अ गटात आपलं पहिलं स्थान गमावलेलं आहे. गुजरातला मागे टाकत सध्या हरियाणा स्टिलर्सचा संघ ‘अ’ गटात आघाडीवर आहे.