सिद्धार्थ देसाईवर बोली न लावणं म्हणजे मूर्खपणा ठरेल – अभिषेक बच्चन

सिद्धार्थवर सर्व संघमालकांचं लक्ष

प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाचा लिलाव सोमवार आणि मंगळवारी मुंबईत पार पडला जाणार आहे. या हंगामात सर्व महत्वाच्या खेळाडूंना संघमालकांनी कायम न राखता नवीन खेळाडूंना संधी दिलेली आहे. यू मुम्बाकडून सहावा हंगाम गाजवणारा सिद्धार्थ देसाईही यंदाच्या हंगामात पुन्हा लिलावात उतरणार आहे. यू मुम्बाने यंदा सिद्धार्थला कायम राखण्यात कोणतंही स्वारस्य दाखवलेलं नाहीये. त्यामुळे यंदाच्या हंगामात सिद्धार्थवर सर्व संघमालकांनी नजर असेल यात काही शंका नाही. लिलावाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत जयपूर पिंक पँथर्सचा मालक अभिषेक बच्चन याने याबद्दलचे सुतोवाचही केलं.

“सिद्धार्थ देसाईवर या लिलावात कोणी बोली लावली नाही तर ते मूर्खपणाचं ठरेल. ज्या पद्धतीने सिद्धार्थने सहाव्या हंगामात खेळ केलाय तो शब्दात मांडता येणारा नाहीये. यू मुम्बाकडे त्याला आपल्या संघात कायम राखण्याची एक संधी असणार आहे. मात्र माझ्या अंदाजानुसार सिद्धार्थ यंदाच्या हंगामातला सर्वात महागडा खेळाडू ठरु शकतो.” अभिषेक बच्चनने आपलं मत मांडलं. यावेळी प्रो-कबड्डीचे लिग कमिशनर अनुपम गोस्वामी आणि पाटणा पायरेट्स संघाचे मालक राजेश शहा देखील उपस्थित होते.

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात दीड कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीसह एकंदर सहा जणांनी एक कोटीचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवले होते. मात्र या कोटय़धीश खेळाडूंपेक्षा उदयोन्मुख खेळाडूंनीच कामगिरी उंचावली. या पाश्र्वभूमीवर सोमवार आणि मंगळवारी मुंबईत होणाऱ्या प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाच्या लिलावात कोटी कोटी उड्डाणांना मर्यादा येण्याची चिन्हे आहेत. याऐवजी उदयोन्मुख खेळाडूंवरच फ्रेंचायझींचे विशेष लक्ष असेल, असा कबड्डीक्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.

मागील वर्षी प्रो कबड्डीच्या लिलावात कोटय़वधी रुपये कमावणाऱ्या कबड्डीपटूंपैकी रिशांक देवाडिगा आणि फझल अत्राचाली या दोनच खेळाडूंचे संघ बाद फेरीपर्यंत पोहोचले. मात्र मोनू गोयत, राहुल चौधरी, नितीन तोमर आणि दीपक हुडा हे खेळाडू संघाची कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pro kabaddi season 7 auction foolish if any team didnt bid for siddarth desai says jaipur pink panthers owner abhishek bachhan

ताज्या बातम्या