scorecardresearch

प्रो लीग हॉकी (पुरुष) : भारतीय संघाची अर्जेटिनावर मात

मनदीप सिंगने अखेरच्या मिनिटात झळकावलेल्या गोलच्या जोरावर भारताने ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमध्ये अर्जेटिनावर ४-३ अशी सरशी साधली.

पीटीआय, भुवनेश्वर 

मनदीप सिंगने अखेरच्या मिनिटात झळकावलेल्या गोलच्या जोरावर भारताने ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमध्ये अर्जेटिनावर ४-३ अशी सरशी साधली. या दोन संघांमध्ये शनिवारी झालेल्या लढतीत भारताला शूटआऊटमध्ये पराभूत व्हावे लागले होते. मात्र, रविवारी भारताने या पराभवाची परतफेड केली.

या सामन्यात भारताकडून जुगराजने (२० आणि ५२ वे मिनिट) दोन गोल मारले. तर, हार्दिक सिंगने (१७ वे मि.) एक गोल झळकावला. मनदीपने सामना संपायला केवळ २६ सेकंद शिल्लक असताना निर्णायक गोल मारला. अर्जेटिनाकडून डेला टोरे निकोलस (४० वे मि.), डोमेन टॉमस (५१ वे मि.) आणि मार्टिन (५६ वे मि.) यांनी गोल केले. या विजयानंतर गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे. त्यांचे आठ सामन्यानंतर १६ गुण आहेत. अर्जेटिना चौथ्या स्थानी कायम असून त्यांचे सहा सामन्यात ११ गुण आहेत.

किलगा स्टेडियमवर पार पडलेल्या या लढतीतील दुसऱ्या सत्रात भारताने तीन मिनिटांच्या आत दोन गोल केले. तिसऱ्या सत्रात अर्जेटिनाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पेनल्टी कॉर्नरच्या सहाय्याने निकोलसने ४० व्या मिनिटाला गोल केला. चौथ्या सत्रात दोन्ही संघांनी मिळून चार गोल मारले. जुगराजने गोल मारत भारताची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. अर्जेटिनाने सलग दोन गोल मारत सामना बरोबरीत आणला. पण, मनदीपने निर्णायक क्षणी गोल मारत सामना भारताच्या बाजूने झुकवला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pro league hockey indian team defeats argentina amy

ताज्या बातम्या