वृत्तसंस्था, भुवनेश्वर : भारतीय पुरुष हॉकी संघाने प्रो लीगमधील चांगली कामगिरी सुरू ठेवताना शनिवारी इंग्लंडवर ३-३ अशा नियमित वेळेतील बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ अशी सरशी साधली. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाने यंदा प्रो लीग हॉकीमध्ये सातत्यपूर्ण खेळ केला आहे. त्यांचा हा नऊ सामन्यांतील पाचवा विजय ठरला असून हा संघ १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावरील जर्मनीच्या खात्यावर १७ गुण असून ते भारतापेक्षा एक सामना कमी खेळले आहेत.

किलगा स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सामन्याच्या पूर्वार्धात यजमान भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. त्यामुळे मध्यांतराला दोन्ही संघांमध्ये २-२ अशी बरोबरी होती. भारताकडून अभिषेक (१३वे मिनिट) आणि शमशेर सिंग (२६वे मि.) यांनी गोल झळकावले, तर इंग्लंडचे दोन्ही गोल निकोलसने (७ आणि २७वे मि.) पेनल्टी कॉर्नरच्या साहाय्याने केले. उत्तरार्धात सामन्यात चुरस कायम राहिली. ५१व्या मिनिटाला उपकर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, सामना संपायला केवळ एक मिनिट शिल्लक असताना सॅम वॉर्डने गोल केल्यामुळे इंग्लंडने ३-३ अशी बरोबरी साधली आणि विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट खेळवण्यात आला. यात भारताकडून अभिषेकने दोनदा, तर राजकुमार पालने एकदा चेंडू गोलजाळय़ात मारला. आता उभय संघांमध्ये रविवारी दुसऱ्या टप्प्यातील सामना खेळवण्यात येईल.

भारत-जर्मनी सामन्यांचे पुनर्नियोजन

नवी दिल्ली : करोना साथीमुळे लांबणीवर पडलेल्या भारत-जर्मनी यांच्यातील प्रो लीग हॉकीच्या सामन्यांचे शनिवारी पुनर्नियोजन करण्यात आले आहे. हे दोन सामने अनुक्रमे १४ आणि १५ एप्रिलला भुवनेश्वर येथील किलगा हॉकी स्टेडियमवर होणार आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने दिली आहे. उभय संघांमध्ये याआधी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत लढत झाली होती. या सामन्यात भारताने जर्मनीला ५-४ असे नमवून ऑलिम्पिक कांस्यपदक कमावले होते.