मेक्सिको आणि क्रोएशियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागल्याने कॅमेरूनचे विश्वचषकातले आव्हान संपुष्टात आले, मात्र पराभव होणार या नैराश्येने कॅमेरूनच्या खेळाडूंनी गैरवर्तन केले असून या प्रकरणाचा कॅमेरून फुटबॉल महासंघ तपास करणार आहे. कॅमेरूनचा बचावपटू बेनॉइट असोयु-इकोटोने आपल्याच सहकाऱ्याला डोक्याने धक्का दिल्याचे उघड झाले होते.
‘‘गैरव्यवहार खेळभावनेला बट्टा लावणारे आहेत, तसेच या प्रकरणाचा तपास करून ब्राझीलच्या सामन्यापूर्वी आम्ही योग्य ती कारवाई करू,’’ असे कॅमेरून फुटबॉल महासंघाने स्पष्ट केले आहे. क्रोएशियाविरुद्धच्या लढतीत सामना संपायला काही मिनिटे असताना कॅमेरूनच्या असोयु-इकोटोने संघसहकारी बेंजामिन मौऊकानजोला डोक्याने धक्का दिला. त्यानंतर या दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. त्यांच्यातले हे भांडण कॅमेरूनच्या अन्य खेळाडूने सोडवले. त्यापूर्वी मध्यरक्षक अलेक्स साँगवर क्रोएशियाचा खेळाडू मारियो मंडझुकिकला कोपऱ्याने धक्का दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. असोयु-इकोटो आणि मौऊकानजो यांच्यातील वाद कल्पनेपलीकडचा असून, त्यामागची कारणे शोधण्यात येतील असे कॅमेरूनचे प्रशिक्षक व्होल्कर फिन्के यांनी सांगितले. कॅमेरून विश्वचषकासाठी दाखल होण्यापूर्वीही वादाला तोंड फुटले होते. महासंघाने बोनस द्यायला नकार देण्यावरून कॅमेरूनच्या खेळाडूंनी ब्राझीलला जाण्यास नकार दिला होता.