Fight In PSL: भारतात सध्या आयपीएल २०२६ स्पर्धा सुरु आहे. तर पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएसएल स्पर्धेचा थरार सुरु आहे. ज्या विदेशी खेळाडूंना आयपीएल खेळण्याची संधी मिळालेली नाही. ते सध्या पीएसएल खेळण्यात व्यस्त आहेत. ही स्पर्धा क्रिकेट आणि रेकॉर्ड्स सोडून इतर बऱ्याच कारणांमुळे चर्चेत असते. याआधी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी बाद झाल्यानंतर रागात बॅट आपटताना दिसून आला होता. दरम्यान गुरुवारी स्पर्धेतील ३४ वा सामना रावळपिंडी आणि इस्लामाबाद यूनायटेड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मोहम्मद आमिरने फहीम अशरफला बाद केल्यानंतर, असं काही केलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

तर झाले असे की, रावळपिंडी संघाची फलंदाजी सुरु असताना, १७ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद आमिर गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी स्ट्राईकवर असलेल्या फहीम अशरफने मोहम्मद आमिरच्या बाऊन्सर चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू बॅटचा कडा घेऊन यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानच्या हातात गेला. त्याने कुठलीही चूक न करत सोपा झेल घेतला.

विकेट घेतल्यानंतर मोहम्मद आमिरने जे नको करायला होतं, तेच केलं. त्याने रागात फहीम अशरफला मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला. मोहम्मद आमिरने केलेला हा इशारा फहीम अशरफला मुळीच आवडलं नाही. फहीम अशरफ मोहम्मद आमिरच्या अंगावर धावून गेला. दोघांमध्ये बाचाबाची सुरु होती. इतक्यात इस्लामाबाद युनायटेड संघातील खेळाडू मध्यस्थी करण्यासाठी धावून आले. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात रावळपिंडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इस्लाबाद युनायडेट संघाकडून डेवोन कॉन्व्हेने ४० धावांची खेळी केली. तर ख्रिस ग्रीनने २९ धावांची खेळी केली. तर मार्क चॅपमनने २३ धावा केल्या. इस्लामाबाद युनायटेड संघाचा डाव १३७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना रावळपिंडी संघाकडून मोहम्मद रिझवानने ४५, कामरान घुलामने ४२ आणि शेवटी डॅरिल मिशेलने नाबाद ३२ धावांची खेळी केली. हा सामना रावळपिंडी संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला.