Ball Tempering In PSL: पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग २०२६ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून काही ना काही असं घडत आहे, ज्याची तुफान चर्चा होत आहे. पहिल्याच सामन्यात लो क्वॉलिटी जर्सीमुळे पांढरा चेंडू गुलाबी झाला होता. स्पर्धेच्या ओपनिंगनंतर नसीम शाहने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्याने पंतप्रधानांच्या मुलीवर निशाणा साधला होता. पण पीसीबीकडून नोटीस आल्यानंतर ही पोस्ट डिलीट करावी लागली होती. आता पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा बॉल टेम्परिंगमुळे चर्चेत आली आहे.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत बॉल टेम्परिंगचा प्रकार घडला आहे.शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि फखर जमान हे पाकिस्तानचे तिन्ही प्रमुख खेळाडू बॉल टेम्परिंग करताना दिसून आले आहेत. बॉल टेम्परिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही घटना कराची किंग्स आणि लाहोर कलंदर्स या दोन्ही संघांदरम्यान झालेल्या सामन्यात घडली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, या सामन्यातील शेवटच्या षटकात कराची किंग्स संघाला विजयासाठी १४ धावांची गरज होती. हे तिन्ही खेळाडू बॉल टेम्परिंग करताना दिसून आले. हे अंपायरने पाहिलं. त्यावेळी ५ धावांची पेनल्टी देण्यात आली. त्यामुळे कराची किंग्सला विजयासाठी ९ धावांचं आव्हान देण्यात आलं. अंपायरने दिलेल्या या निर्णयामुळे शाहीन आफ्रिदी नाराज असल्याचं दिसून आलं. या षटकातील पहिल्याच चेंडूवर खुशदील शाह बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर हरिस रौफने वाईड चेंडू टाकला. त्यानंतर ८ धावांची गरज असताना, एक चौकार आणि एक षटकार मारून कराची किंग्स संघाने विजयाची नोंद केली.

या सामन्यात लाहोर कलंदर्स संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकांअखेर ९ गडी बाद १२८ धावा केल्या. या संघाकडून अब्दुल्ला शफिकने ३३ धावांची खेळी केली. तर हसीबु्ल्लाह खानने २८ धावांची खेळी केली. तर सिकंदर रझाने १९ धावा केल्या. कराची किंग्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुहम्मद वसीमने ३८ धावांची खेळी केली. तर साद बैगने १९ धावा केल्या आणि मोईन अलीने १८ धावा केल्या. हा सामना कराची किंग्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवला.