PSL Winner Prize Money: पाकिस्तान सुपर लीग २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना हैदराबाद किंग्समन आणि पेशाव जाल्मी या दोन्ही संघांमध्ये पार पडला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पेशावर जाल्मी संघाने जेतेपदाचा मान पटकावला. हा सामना पेशावर जाल्मी संघाने ५ गडी राखून आपल्या नावावर केला. पेशावर जाल्मी संघाने दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. दरम्यान ही स्पर्धा जिंकणाऱ्या पेशावर जाल्मी संघाला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली? जाणून घ्या.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली?

पाकिस्तान सुपर लीग विजेत्या पेशावर जाल्मी संघाला मोहसिन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी आणि १४ कोटी पाकिस्तानी रुपयांचा चेक देण्यात आला. ही रक्कम दिसायला मोठी दिसत असली, तरीदेखील भारतीय चलनानुसार, ही रक्कम केवळ ४.७६ कोटी रुपये इतकी आहे. कारण पाकिस्तानचा १ रुपया हा भारताच्या १ रुपयाच्या तुलनेत केवळ ०.३४ पैसै इतका आहे. त्यामुळे पेशावर जाल्मी संघाला १४ कोटींचा चेक तर मिळाला, पण ही रक्कम ऋषभ पंतला आयपीएलच्या एका हंगामासाठी मिळणाऱ्या मानधनापेक्षा ५ पटीने कमी आहे. ऋषभ पंतला आयपीएलच्या एका हंगामासाठी २७ कोटी रुपये मिळतात. ही रक्कम पाकिस्तानात ८० कोटींच्या घरात आहे.

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात हैदराबाद किंग्समनचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून सॅम अयुबने ५० चेंडूंचा सामना करत ५४ धावांची खेळी केली. तर कर्णधार मार्नस लबुशेनने अवघ्या २० धावांचे योगदान दिले. सॅम अयुबचं अर्धशतक वगळलं, तर इतर कुठल्याही फलंदाजाला फलंदाजीत योगदान देता आलं नाही. पेशावर जाल्मी संघाकडून गोलंदाजी करताना अॅरोन हार्डीने ४ गडी बाद केले. तर नाहीद राणाने २, सुफिया मुकीन आणि मोहम्मद बासित यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले. हैदराबाद संघाचा डाव पहिल्या डावात फलंदाजी करताना १८ षटकात अवघ्या १२९ धावांवर आटोपला.

हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पेशावर जाल्मी संघाला हवी तशी सुरूवात करता आली नाही. पण ज्या गोलंदाजाने गोलंदाजीत ४ गडी बाद केले, त्याच हार्डीने फलंदाजीत ३९ चेंडूंचा सामना करत ५६ धावांची खेळी केली. ज्यावेळी तो फलंदाजी करण्यासाठी आला, त्यावेळी संघाची धावसंख्या अवघी ३३ इतकी होती. त्याने अब्दुल समदसोबत मिळून संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून ४८ धावा जोडल्या आणि पेशावर जाल्मी संघाला १५.२ षटकात विजय मिळवून दिला.