वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याला पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना गंभीर दुखापत झाली आहे. क्वेटा ग्लेडिएटर्स संघाकडून खेळत असलेल्या आंद्रे रसेल याच्या डोक्यावर चेंडू आदळल्याने गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इस्लामाबाद यूनाइटेचा वेगवान गोलंदाच मूसा खान याच्या गोलंदाजीवर फटका मारताना अंदाज चुकला आणि चेंडू थेट डोक्यावर आदळला. चेंडूचा वेग अधिक असल्याने तो मैदानातच कोसळला. मात्र थोडं बरं वाटल्याने त्याने पुन्हा खेळण्यास सुरुवात केली आणि मुसाने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवरच तो झेल बाद झाला.

इस्लामाबाद यूनाइटेडकडून मैदानात १४ वं षटकं टाकणाऱ्या मुसा खानला आंद्रे रसेलने सलग दोन षटकार ठोकले. मात्र तिसरा चेंडू रसेलला कळलाच नाही. मुसाचा बॉउन्सर थेट त्याच्या डोक्याला आदळला. हेल्मेट असल्याने तो थोडक्यात बचावला. त्यानंतर तात्काळ फिजिओ आंद्रे रसेलला तपासण्यासाठी मैदानात आले. मात्र दुखापतीकडे दुर्लक्ष करत त्याने पुन्हा खेळण्यास सुरुवात केली. मुसाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद वासिमने त्याचा झेल घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. मात्र त्याला चालताही येत नसल्याने अखेर मैदानातून स्ट्रेचरवरून थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आंद्रे रसेलने ६ चेंडूत १३ धावा केल्या. त्यात दोन षटकारांचा समावेश आहे.

रसेल ऐवजी नसीम शाह मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरला होता. मात्र इस्लामाबादच्या संघाने या निर्णयाला विरोध केला. कर्णधार शादाब खान यांनी आपली नाराजी पंच अलीम दार यांच्याकडे व्यक्त केली. मात्र लाइक-टू-लाइक बदलीचा निर्णय हा सर्वस्वी सामनाधिकाऱ्यांवर असतो. रसेल गोलंदाजी करणार नसल्याने शाहला मैदानात संधी देण्यात आली होती.

Video : सामना सुरू असतानाच शाकिब अल हसनने काढून फेकले स्टंप; अंपायरच्या निर्णयावर भडकला

क्वेटा ग्लाडिएटर्सने इस्लामाबादसमोर विजयासाठी १३३ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र हे लक्ष्य इस्लामाबादने बिनबाद १० षटकात पूर्ण केलं. इस्लामाबादकडू कोलीन मुनरोने ३६ चेंडूत ९० धावांची वादळी खेळी केली. यात ५ षटकार आणि १२ चौकारांचा समावेश आहे.