नवी दिल्ली :  मी माझे आयुष्य जगतो एवढेच मला माहीत आहे. मग ते आयुष्य असो वा क्रिकेट कारकीर्द, ते परिपूर्ण आहे की नाही याचा मी विचार करत नाही. मी समोर आलेला प्रत्येक क्षण जगतो, असे भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने म्हटले आहे. एक अभियंता, क्रिकेटपटू आणि लोकप्रिय यूट्यूबर म्हणून अश्विनकडे बघितले जाते. आता तो लेखक म्हणूनही समोर येत आहे. अश्विनचे ‘आय हॅव द स्ट्रीट्स: अ कुट्टी क्रिकेट स्टोरी’ हे पुस्तकच नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

‘‘माझ्यासमोर जी काही लक्ष्ये आहेत ती पूर्ण झाली की नाही, याचाही मी विचार करत नाही. मी एक सर्जनशील व्यक्ती आहे. मला जर एखादी गोष्ट करावीशी वाटली तर ती मी करतो, मग ती चूक आहे की बरोबर याचा विचार करत नाही. मी असे समोर येणारे प्रत्येक क्षण जगत असतो’’, असे अश्विन म्हणाला.

हेही वाचा >>>Vinesh Phogat : विनेश फोगटची प्रतीक्षा पुन्हा वाढली… आता रौप्यपदकासाठीचा क्रीडा लवादाचा निर्णय ‘या’ दिवशी येणार

‘‘मी पूर्वी कधीच इतका निर्भय नव्हतो. ती माझी असुरक्षित बाजू होती. त्यामुळे काहीसा अविचल झालो होतो. पण वेळीच त्यातून बाहेर पडलो आणि स्वत:ला बदलत गेलो. आता मला जोखीम घ्यायला आवडते, अपयशाची भीती बाळगूच शकत नाही,’’ असे अश्विनने सांगितले.