पीटीआय, बंगळूरु : चेतेश्वर पुजारा सहजासहजी बाद होत नाही. सातत्याने योग्य टप्प्यावर गोलंदाजी करून त्याला बाद करावे लागते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध मिळवलेले यश गोलंदाजासाठी खूप खास असते, असे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने केले. तसेच पुजारा ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्याने ऑस्ट्रेलियाला त्याचा द्वेष असल्याचेही हेझलवूड म्हणाला.
नुकत्याच झालेल्या ‘बॉर्डर-गावस्कर’ करंडकाच्या मालिकेत पुजाराने १०० कसोटी सामन्यांचा टप्पा पार केला. या मालिकेच्या चार सामन्यांत पुजाराला मोठी खेळी करण्यात अपयश आले, पण त्याने काही महत्त्वाच्या छोटेखानी खेळी करत भारताच्या यशात योगदान दिले. ३५ वर्षीय पुजाराने १०२ कसोटी सामन्यांत ७००० हून अधिक धावा केल्या असून यात १९ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. पुजाराने ऑस्ट्रेलियात झालेल्या २०१८-१९च्या ‘बॉर्डर-गावस्कर’ कसोटी मालिकेच्या चार सामन्यांत ७४.४२च्या सरासरीने तीन शतकांसह ५२१ धावा केल्या होत्या. त्याने तब्बल १२५८ चेंडू खेळून काढले होते.
‘‘पुजाराला बाद करणे कोणत्याही गोलंदाजासाठी खास यश आहे. तो चुकीचा फटका मारून बाद होत नाही. गोलंदाज म्हणून तुम्हाला त्याला बाद करावे लागते. तुम्हाला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते. तो पाचव्या चेंडूवर बाद झाला, तरी त्यापूर्वीच्या सामन्यांमध्ये तुम्ही त्याच्याविरुद्ध बरीच गोलंदाजी केलेली असते. त्यामुळे तुम्ही त्याचा बळी मिळवता, तुम्ही त्याचा आदर मिळवता,’’ असे हेझलवूड म्हणाला.
पुजाराविरुद्ध गोलंदाजी करणे हे वेगळेच आव्हान आहे. परंतु हे आव्हान स्वीकारताना मजा येते, असेही हेझलवूडने नमूद केले. ‘‘आमच्यात अनेकदा चांगले द्वंद्व झाले आहे. विशेषत: ऑस्ट्रेलियात त्याने उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पुजाराचा द्वेष करायला आवडते, पण तो उत्कृष्ट खेळाडू आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. तुम्ही त्याला बाद करता, तेव्हा तो बळी मिळवलेला असतो, सहजासहजी मिळालेला नसतो,’’ असे हेझलवूडने सांगितले.
‘आयपीएल’च्या पूर्वार्धाला मुकणार
पायाच्या दुखापतीतून अजून पूर्णपणे न सावरल्याने हेझलवूड ‘आयपीएल’च्या आगामी हंगामातील पूर्वार्धाला मुकण्याची दाट शक्यता आहे. ‘‘हेझलवूडला तंदुरुस्त होण्यासाठी किमान चार-पाच सामन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतरच तो खेळण्यासाठी उपलब्ध होईल,’’ असे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. हेझलवूडने गेल्या हंगामात बंगळूरुकडून २० गडी बाद केले होते. परंतु त्यानंतर त्याला दुखापतींनी सतावले आहे. गेल्या दोन वर्षांत हेझलवूडने केवळ चार कसोटी सामने खेळले आहेत.