बंगालकडून बंगळुरू बुल्सचा पराभव; यू मुंबाकडून पराभवामुळे तेलुगू टायटन्सचे आव्हान संपुष्टात

स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या दोन हंगामांमध्ये आपली छाप पाडण्यात अपयशी ठरलेल्या बंगाल वॉरियर्स आणि पुणेरी पलटण या संघांनी तिसऱ्या हंगामात मात्र प्रथमच उपांत्य फेरी गाठण्याची किमया साधली. मंगळवारी बंगालने बंगळुरू बुल्सचा २६-२२ अशा फरकाने पराभव करून ४७ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. याचप्रमाणे यू मुंबाकडून ३८-२२ अशा फरकाने पराभूत झाल्यामुळे तेलुगू टायटन्सचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे पटणा पायरेट्स, यू मुंबा आणि बंगालसहित पुणेरी पलटणसाठीही उपांत्य फेरीचे दरवाजे खुले झाले.

वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियमवर चालू असलेल्या प्रो कबड्डीच्या अखेरच्या साखळी टप्प्यातील तिसरा दिवस बंगालसाठी निर्णायक ठरला. बंगालने मध्यंतराला १३-११ अशी नाममात्र आघाडी घेतली होती. उत्तरार्धातसुद्धा बंगळुरूने अनपेक्षितपणे चांगली लढत दिली. दुखापतग्रस्त बचावपटू गिरीश इर्नाकची उणीव बंगालला तीव्रतेने भासली. बंगालकडून नीलेश शिंदेने चढायांचे ७ गुण मिळवले, तर कोरियाच्या जँग कुन लीने चढायांचे ६ गुण मिळवले. बंगळुरूकडून दीपककुमार दहिया अप्रतिम खेळला. पूर्वार्धात त्याने एकाच चढाईत तीन गुण मिळवण्याची किमया साधली. बंगळुरूचा हा सलग दहावा पराभव ठरला.‘‘बंगालच्या संघात बहुतांशी महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईकर क्रीडारसिकांचा चांगला पाठिंबा  मिळाला. त्यांच्याच साक्षीने उपांत्य फेरीत स्थान मिळवल्याने आत्मविश्वास वाढला आहे,’’ असे बंगालचा कर्णधार नीलेश शिंदेने सांगितले.

दुसरी लढत ही विलक्षण एकतर्फी झाली. यू मुंबाने १२व्या मिनिटाला पहिला लोण चढवला आणि मध्यंतराला १८-१० अशी आघाडी घेतली. मग दुसऱ्या सत्रात यू मुंबाने २३व्या आणि ३२व्या मिनिटाला असे आणखी दोन लोण चढवले. चतुरस्र चढायांनी वर्चस्व गाजवत रिशांक देवाडिगा (१४ गुण) यू मुंबाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मोहित चिल्लरच्या पकडींनी या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तेलुगू टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरीने (१२ गुण) पराभव टाळण्यासाठी  शर्थीने प्रयत्न केले.

आजचे सामने

  • पुणे वि. बंगाल
  • यू मुंबा वि. दबंग दिल्ली
  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ व एचडी २, ३.