पुणे : नारायणपूरच्या एकमुखी दत्त महाराज, पुढे जाऊन केतकावळे येथील बालाजीचा आशीर्वाद घेत, मग ऐतिहासिक सिंहगडावरील तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची प्रेरणा घेत आव्हानात्मक अशा पुणे ग्रँड टूर सायकलिंगच्या ‘मराठा हेरिटेज’ या दुसऱ्या टप्प्यातही चीनच्या ली निंग स्टार संघाच्या ल्युक मडग्वे याने बाजी मारली.
तीव्र चढण आणि तितक्याच धोकादायक उतरणीच्या मार्गावर सहनशक्ती आणि धैर्याची कठीण परीक्षा देत ल्यूकने दुसऱ्या टप्प्यातील १०५.३ किमीचे अंतर २ तास ३१ मिनिटे ४९ सेकंदात पार करत सलग दुसऱ्या दिवशी यलो जर्सीचा मान मिळवला. दुसऱ्या टप्प्यातील विजयासह ल्यूकने आता पुणे ग्रँड टूर शर्यतीवर पकड मिळवली आहे. आज, गुरुवारी होणाऱ्या सासवड ते बारामती या १३४ किमी अंतराच्या टप्प्यातही ल्यूकने विजय मिळवल्यास अंतिम टप्प्याला सामोरे जाताना त्याची आघाडी भक्कम होईल.
कॅम्प परिसरातील लेडिज क्लबपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. नारायणपूर आणि केतकावळे या जिल्ह्यातील दोन श्रद्धास्थानांवरून पुढे जात कोंढणपूर मार्गे सिंहगडाच्या चढावरून मार्ग आखताना सायकलपटूंच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागली. तोपर्यंत साधारण ६० ते ६३ किमी वेग राखणाऱ्या सायकलपटूंचा चढावरच्या मार्गावर मात्र वेग कधी ४९, कधी ४३ किमी असा खाली येत होता. जेवढे तीव्र चढण होते, तेवढाच उतार तीव्र असल्यामुळे हा वेग पुन्हा वाढला. तेव्हा सायकलपटूंच्या वेगावरील नियंत्रणाची कसोटी लागली. ल्यूकने नेमक्या याच आघाडीवर आपली हुकुमत दाखवून थाटात सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीसमोर अंतिम रेषा गाठली, तेव्हा उपस्थित पुणेकरांनी उत्स्फूर्त जल्लोष करत त्याचे स्वागत केले. भारतीय गटात भारतीय विकास संघाच्या मानव सारडा याने सरस वेळ देत ब्ल्यू जर्सी मिळवली.
बेनेटोन ‘किंग ऑफ माउंटन’
दुसऱ्या टप्प्यातील आव्हानात्मक डोंगरदऱ्याचा मार्ग सर्वांत सरस वेळेसह पार करण्याचा मान गुआमच्या युरोसायकलिंग ट्रिप्स-सीसीएन संघाच्या स्टीफन बेनेटोन याने मिळवला. या टप्प्यातील आव्हानात्मक येवलेवाडी (९७७ मीटर), कुसेगाव (८९५ मीटर) आणि कोंढणपूर (१००० मीटर) या मार्गावर अधिक कौशल्याने सायकलिंग करत बेनेटोन याने सर्वाधिक दहा गुणांची कमाई करताना ‘किंग ऑफ माउंटन’चा मान मिळवला.
‘फोटो फिनिश’मध्ये निर्णय
चढ-उताराचा दुसरा टप्पा जेवढा सायकलपटूंसाठी आव्हानात्मक ठरला, तेवढाच या टप्प्याचा निर्णय घेणे तांत्रिक अधिकाऱ्यांना आव्हानात्मक गेले. ल्यूकसह थायलंडच्या रूजाई इन्शुरन्स विनस्पीड संघाच्या ॲलन कार्टर बीटल्स, बेल्जियमच्या टार्टेलेटो-इसोरेक्स संघाच्या योर्बेन लॉरिसन, स्पेनच्या बर्गोस बुरपेलेट बीएच संघाचे क्लेमेंट एलोनो, जंबालजम्ट्स सेनबायर, गुआमच्या युरोसायकलिंग ट्रिप्स – सीसीएन संघाचा स्टीफन बेनेटोन या सहा स्पर्धकांनी २ तास ३१ मिनिटे ४९ सेकंद अशा समान वेळेत शर्यत पूर्ण केली. त्यामुळे तांत्रिक अधिकाऱ्यांनी ‘फोटो फिनिश’ तंत्राचा अवलंब करून दुसऱ्या टप्प्यातील पहिले सहा क्रमांक निश्चित केले. बीटल्स दुसऱ्या आणि लॉरिसन तिसऱ्या स्थानावर आले. पहिल्या तीन क्रमांकावरील सायकलपटूंना नियमाप्रमाणे अनुक्रमे १०, ६ आणि ४ सेकंदाचा बोनस देण्यात आला. (फोटो २१ सायकल)
