पुणे : भारतीय परंपरेतील मातीत खेळला जाणारा खो-खो खेळ अल्टिमेट खो-खो लीगच्या माध्यमातून रविवारपासून (१४ ऑगस्ट) नव्या रूपात समोर येत आहे. पहिल्यावहिल्या या राष्ट्रीय स्तरावरील खो-खो लीगसाठी पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल सज्ज झाले आहे.

चेन्नई क्विक गन्स, गुजरात जायंट्स, मुंबई खिलाडीज, ओडिशा जुगरनटस, राजस्थान वॉरियर्स आणि तेलुगू योद्धा हे सहा संघ या पहिल्या मोसमातील लीगच्या विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. मातीतला जोश अनुभवणाऱ्या चाहत्यांना आता खो-खोच्या आधुनिक स्वरूपाचे दर्शन होणार असून, अल्पावधीत ही लीग लोकप्रिय होईल, असा विश्वास अल्टिमेट खो-खो स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेन्झिग नियोगी यांनी व्यक्त केला. या वेळी पहिल्या मोसमाचा भागीदार अभिनेता अपारशक्ती खुराना पुण्यात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होता. या वेळी सहा संघांच्या कर्णधारांनी लीगसाठी सर्वच जण कमालीचे उत्सुक असल्याचे सांगितले.

लीगसाठी मैदान छोटे असेल आणि नियमही नवे आहेत. याच्याशी जुळवून घेणे आव्हानात्मक होते. पण, आव्हानांशिवाय खेळाडूची कारकीर्द पुढे जाऊच शकत नाही, असे मत सर्व कर्णधारांनी मांडले.

या लीगचे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरून विविध पाच भाषांमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. लीगमध्ये रोज दोन सामने ७ ते ९ या वेळात खेळवण्यात येतील. स्पर्धेच्या तिकीट विक्रीला ‘बुकमाय शो’वरून सुरुवात झाली आहे.