scorecardresearch

सामना सुरु असतानाच कब्बडीपटू संदीप नांगलवर गोळीबार, उपचाराआधीच झाला मृत्यू; समोर आला धक्कादायक Video

चार अज्ञात व्यक्ती सामना सुरु असताना मैदानात आल्या आणि त्यांनी गोळीबार सुरु केला.

Sandeep Nangal shoot dead video
सोमवारी सायंकाळी घडला हा सर्व प्रकार

अंतरराष्ट्रीय स्तरावरील कब्बडीपटू असणाऱ्या संदीप नांगल याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. पंजाबमधील जलंदर येथे सोमवारी सायंकाळी चार जणांनी संदीपवर गोळीबार केल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलीय.

शाहकोट येथील मल्लियन कालन गावामध्ये एका कब्बडी स्पर्धेमध्ये संदीप सहभागी झाला होता. त्याचवेळी त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. “चार जण कारमधून आले आणि सामना सुरु असतानाच त्याच्यावर गोळीबार केला. या प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करुन घेण्यात आला असून आम्ही तपास करत आहोत. शवविच्छेदनानंतरच अधिक माहिती देता येईल,” असं जलंदर पोलिसांचे एसएसपी सतिंदर सिंग यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

संदीप कब्बडी सामन्यासाठी मैदानात उतरला असतानाच चार अनोळखी व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला. संदीपवर एकूण आठ ते दहा गोळ्या चालवण्यात आला. घटनास्थळी १० गोळ्यांच्या रिकाम्या नळ्या सापडल्या आहेत. संदीपवर हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेत त्याला नाकोडर येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याला तिथे मृत घोषित करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकरणात पोलीस आता तपास करत आहेत. सोशल मीडियावर या हल्ल्याच्या वेळेचा व्हिडीओ व्हायरल झालाय. यामध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तींबरोबरच गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची धावपळही दिसून येत आहे.

संदीप हा नांगल अंबियान गावातील रहिवाशी होता. संदीप त्याच्या कुटुंबासोबत इंग्लंडमध्ये स्थायिक झालेला. मात्र कब्बडीच्या प्रेमापोटी तो आवर्जून भारतात यायचा. त्याने काही कब्बडीच्या स्पर्धाही स्थानिक स्तरावर सुरु केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punjab international kabaddi player sandeep nangal shot dead in jalandhar scsg

ताज्या बातम्या