Punjab Kings Record Against Mumbai Indians: पंजाब किंग्सने (PBKS) आयपीएल २०२६ मध्ये चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा वानखेडे स्टेडियमवर ७ विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे पंजाब किंग्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला असून ते स्पर्धेत अद्याप अपराजित असलेला एकमेव संघ ठरले आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा खराब फॉर्म कायम राहिला आणि त्यांना सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. या मोठ्या विजयासह PBKS ने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला. त्यांनी इतिहासात पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सविरुद्ध एक मोठी कामगिरी केली आहे.
पंजाब किंग्सने आयपीएलच्या इतिहासात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध आपला सहावा विजय नोंदवला आहे. पाच वेळा विजेते ठरलेल्या मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर इतक्या वेळा पराभूत करणारा पंजाब किंग्स हा पहिलाच संघ ठरला आहे. त्यांनी याआधीचा चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांचा संयुक्त विक्रम मोडला.
आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आता पंजाब किंग्सच्या नावावर आहे. पंजाबने या स्टेडियमवर खेळलेल्या ११ आयपीएल सामन्यांपैकी सहा वेळा मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने या मैदानावर खेळलेल्या १३ आयपीएल सामन्यांपैकी पाच वेळा मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आहे. आरसीबीनेही या मैदानावर पाच वेळा मुंबईला पराभूत करण्याची ही कामगिरी केली आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने या मैदानावर खेळलेल्या नऊ सामन्यांपैकी चार वेळा मुंबईला पराभूत केलं आहे.
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे संघ:
पंजाब किंग्स – ६ विजय (११ सामने)
चेन्नई सुपर किंग्स – ५ विजय (१३ सामने)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – ५ विजय (१३ सामने)
राजस्थान रॉयल्स – ४ विजय (९ सामने)
पंजाब किंग्सने आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सविरुद्ध एकूण १८वा विजयही नोंदवला आहे. त्यामुळे ते मुंबईविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांमध्ये अग्रस्थानी पोहोचले आहेत. चेन्नई सुपर किंग्सनेही मुंबईविरूद्ध १८ सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत.
आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे संघ:
पंजाब किंग्स – १८ विजय (३५ सामने)
चेन्नई सुपर किंग्स – १८ विजय (३९ सामने)
दिल्ली कॅपिटल्स – १७ विजय (३८ सामने)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – १६ विजय (३५ सामने)
राजस्थान रॉयल्स – १५ विजय (३१ सामने)
