मुंबई इंडियन्सचा संघ प्रतिभाशाली खेळाडूंना हेरून त्यांना संधी देण्यासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईच्या संघात राघू नावाचा फिरकीपटू आहे. ८ वर्षांपूर्वी राघू मुंबई इंडियन्स संघाच्या ट्रायल्स पार करू शकला नव्हता. मात्र आता तो संघाचा भाग झाला आहे. राघूचा इथपर्यंतचा प्रवास रोलर कोस्टर राईडसारखा.

राघूचा जन्म जालंधरचा. अठराव्या वर्षापर्यंत तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळला नाही. पंजाबचा हा उमदा तरुण दूर दक्षिणेतल्या पुदुच्चेरी इथे जाऊन क्रिकेट खेळू लागला. त्यानंतर क्रिकेट खेळण्यासाठी पाचूचं बेट असलेल्या श्रीलंकेत पोहोचला. त्यानंतर इंग्लंडमध्ये गेला. क्रिकइन्फो वेबसाईटशी बोलताना राघूने आपला प्रवास उलगडला.

राघूच्या घरी डॉक्टर अभियंते अशीच परंपरा. २०११ मध्ये राघूनेही तीच परंपरा कायम राखत जालंधरमध्येच इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकला होता. धोनी ब्रिगेडच्या त्या झळाळत्या यशाने राघूला प्रेरणा दिली. घराजवळच्या बर्ल्टन पार्कात खेळायला सुरुवात केली. पण एक समस्या होती. राघू सांगतो, ‘माझं वजन १०२ किलो होतं. जुने फोटो पाहिलेत तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. तेव्हाच्या राघूत आताचे २-३ राघू सामावतील. मी तोपर्यंत क्रिकेट खेळलो नव्हतो त्यामुळे प्रशिक्षकांकडून फारसं प्रोत्साहन मिळायचं नाही. वजन कमी करायला हवं याची मला जाणीव झाली. ४५-४६ डिग्री तापमानात मी धावत असे. त्यानंतर दोन तास बॉलिंगचा सराव करत असे. पुढच्या सहा महिन्यात ३०-३५ किलो वजन कमी केलं’.

राघूने वेगवान गोलंदाज म्हणून सुरूवात केली. एके दिवशी मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे रनअपविना लेगकटर टाकले. ‘त्यावेळी जालंधर जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षक मदन यांनी मला हेरलं. त्यांनी मला फिरकीकडे वळण्याचा सल्ला दिला’. राघूने हा सल्ला प्रमाण मानला. जगविख्यात फिरकीपटू शेन वॉर्नला अंगीकारून राघूने फिरकीचे बारकावे टिपले.

‘मी शेन वॉर्नचे व्हीडिओ पाहायचो. युट्यूबवर लेगस्पिन ट्यूटोरिअल आहे. ते मी कोळून प्यायलो. जवळपास १० मिनिटांचा व्हीडिओ आहे. चेंडू ग्रिप कसा करावा, लेगब्रेक कसा टाकावा, राँगवन कसा टाकावा, फ्लिपक कसा फेकावा अशी प्रत्येक गोष्ट वॉर्नने सुरेख समजावून सांगितली आहे. मी त्या व्हीडिओची पारायणं केली आहेत’, असं राघू सांगतो.

‘मला त्यांना भेटायचं होतं. एकप्रकारे माझे ते गुरू होते. आजही मी त्यांचे व्हीडिओ पाहतो. भारताचे माजी एम.वेंकटरमण आणि राहुल शर्मा यांच्याकडून राघूने अनेक गोष्टी शिकल्या. मी खूप उशिरा खेळायला सुरुवात केली. युवा खेळाडूंना प्राधान्य दिलं जातं. माझ्याकडे वेळ कमी होता. सुरुवातीला घरच्यांचा पाठिंबा नव्हता पण जसं चांगला खेळू लागलो तसं त्यांनी साथ दिली. शंभर टक्के योगदान पुरेसं नव्हतं, मी २०० टक्के दिले’.

पंजाब संघासाठी राघूची निवड झाली नाही. २०१६ मध्ये हरभजन सिंगने राघूची नेट बॉलर म्हणून शिफारस केली. त्याला ट्रायलसाठी बोलावण्यात आलं मात्र पुढे काही झालं नाही. २०१७-१८ हंगामात युवराज सिंगच्या नेतृत्वात राघूने पंजाबसाठी पदार्पण केलं. दुसऱ्या सामन्यात गोव्याविरुद्ध राघूने सात विकेट्स पटकावल्या. मात्र पुढच्याच सामन्यात त्याला वगळण्यात आलं. पुढच्या हंगामात त्याला एका सामन्यात संधी मिळाली. मात्र त्यानंतर पुन्हा कधीही पंजाबसाठी खेळायला मिळालं नाही.

संधीच्या शोधात राघूने पुदुच्चेरी गाठलं. पुदुच्चेरी संघासाठी पदार्पण केलं. तिथेही फार संधी मिळाली नाहीत. २०१४ मध्ये राघूने वृंदावन शहराला भेट दिली. त्या भेटीचा राघूचं आयुष्य बदलून गेलं. श्रीकृष्णाची शिकवण त्याने अंगीकारली. त्याचा आहार बदलला. स्वत:चा स्वयंपाक स्वत: करायला सुरुवात केली. कांदा लसूण खाणं सोडलं. यामुळे बाहेरचं खाणं जवळपास वर्ज्य झालं.

शिस्त आवश्यक होती. २०२२ मध्ये श्रीलंकेतल्या गॉल क्रिकेट क्लबतर्फे खेळण्याची राघूला संधी मिळाली. सहा सामन्यात त्याने ४६ विकेट्स पटकावल्या. पाचवेळा त्याने डावात पाच विकेट्स पटकावल्या. तीनवेळा सामन्यात दहा विकेट्स घेतल्या. त्या हंगामानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नियम बदलला त्यामुळे तिथे खेळणं थांबलं. विदेशी खेळाडूने त्याच्या देशात पाच तरी फर्स्टक्लास क्रिकेटचे सामने खेळलेलं असणं अनिवार्य करण्यात आलं.

श्रीलंकेनंतर राघूला इंग्लंडमधून बोलावणं आलं. २०२३ मध्ये इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेट खेळायला मिळालं. २१ सामन्यात राघूने ४३ विकेट्स घेतल्या. या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू इम्रान ताहीरकडून शिकण्याची राघूला संधी मिळाली. ‘इम्रानभाईंशी बोलल्यानंतर मला वेगळाच दृष्टिकोन मिळाला. त्यांना पंजाबी येते. त्यामुळे संवाद होणं सोपं झालं. मी थोडी अॅक्शन बदलली. इम्रानभाईंमुळे मी गुगली शिकलो’, असं राघूने सांगितलं. इंग्लंडहून राघू मायदेशी परतला. पुदुच्चेरीकडूनही फारशी संधी मिळत नसल्याने राघू पंजाबला परतला. शेर पंजाब टी२० स्पर्धेसाठी राघूला एनओसी मिळाली नाही. रणजी करंडकावेळी यो यो टेस्टमध्ये तो उत्तीर्ण होऊ शकला नाही. ‘त्याने मी खचून गेलो. सगळं सोडून मी पुरी इथे गेलो. जेव्हाही मन अस्वस्थ होतं तेव्हा मी देवाकडे धाव घेतो. मी ओडिशात समुद्रकिनाऱ्यावर धावण्याचा सराव करत असे. काही दिवस बॉलिंगचा सराव करत असे. ओडिशात क्लब क्रिकेट खेळायचाही मी विचार केला’, असं राघूने सांगितलं.

‘२०२४-२५ मध्ये विजय हजारे चषकावेळी पंजाबचे प्रशिक्षक वासिम जाफर यांनी मला बोलावून घेतलं. मी पुरीहून चंदीगढला गेलो, सगळ्या टेस्ट दिल्या आणि त्या पार केल्या’. विजय हजारे चषकात त्याने ८ सामन्यात १४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या बळावर पंजाबने उपउपांत्य फेरी गाठली. २०२५ मध्ये राघू मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नेट बॉलर म्हणून सहभागी झाला. सरावादरम्यान तसंच अंतर्गत सामन्यांमध्ये त्याने आपल्या खेळाने संघव्यवस्थापनाला प्रभावित केलं.

‘आठ वर्षानंतर मी मुंबई संघाकडे परतलो होतो. २०१७ मध्ये मी ट्रायल दिली होती पण तेव्हा प्रवेश मिळवू शकलो नव्हतो. पण या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या. माझ्या बॉलिंगमध्ये बदल झाले. मानसिकदृष्ट्या मी कणखर झालो. फिटनेसबाबतीत मी अत्यंत जागरुक झालो. विजय हजारे स्पर्धेत मी चांगली कामगिरी केली. याची दखल घेण्यात आली’.