पंजाबचे क्रीडा मंत्री राणा गुरमीत सिंह सोढी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाच्या पंजाबमधील खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपये रोख पुरस्कार जाहीर केला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीविरुद्ध कांस्यपदक जिंकून ४१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने प्ले-ऑफ सामन्यात जर्मनीचा ५-४ असा पराभव केला. सिमरनजीत सिंगच्या दोन गोलमुळे भारताला हा थरारक सामना जिंकता आला.

या ऐतिहासिक प्रसंगी देशभरातून भारतीय पुरुष हॉकी संघाचं अभिनंदन करण्यात येत आहे. त्याचवेळी आनंद साजरा करत असलेल्या राणा गुरमीत सिंह सोढी यांनी संघाच्या पंजाबच्या खेळाडूंना १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. राणा गुरमीत सिंह सोढी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. “भारतीय हॉकीच्या या ऐतिहासिक दिवशी, संघाच्या पंजाबच्या खेळाडूंना एक कोटी रुपये दिले जातील हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. आम्ही तुमच्या परत येण्याची वाट पाहत आहोत जेणेकरून तुम्ही तुमचा हा विजय साजरा करू शकाल,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आठ वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारत सुरुवातीला १-३ ने पिछाडीवर होता. पण नंतर आक्रमक खेळी करत दबाव दूर करण्यात यशस्वी झाला आणि आठ मिनिटांत चार गोल करत विजय नोंदवला. भारताकडून सिमरनजीत सिंग (१७ आणि ३४ मिनिटींवर) ने दोन गोल केले तर हार्दिक सिंह (२७ व्या मिनिटावर), हरमनप्रीत सिंग (२९ व्या मिनिटावर) आणि रुपिंदर पाल सिंगने प्रत्येकी एक गोल केला.

जागतिक क्रमवारीत चौथा क्रमांकावर असणाऱ्या जर्मनीतर्फे तैमुर ओरुझ (दुसरा मिनिटाला), निकलास वेलेन (२४ व्या मिनिटाला), बेनेडिक्ट फर्क (२५ व्या मिनिटाला) आणि लुकास विंडफेडर (४८ व्या मिनिटाला) यांनी गोल केले. हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघ ३-३ गोलने बरोबरीत होते.