Who Is Dilpreet Bajwa: दिलप्रीत बाजवा हा पंजाबसाठी रणजी खेळण्याच्या उंबरठ्यावर होता. मात्र नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. कामानिमित्ताने कॅनडाला गेला. कोरोनामुळे तिकडेच अडकून पडला. तिथे क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि ६ वर्षांनी कॅनडाच्या संघाचा कर्णधार झाला. अविश्वसनीय वाटावी अशी ही कहाणी आहे पंजाबमधल्या एका युवकाची.
भारतीय वंशाचे ४० खेळाडू विविध संघातून खेळत आहेत. दिलप्रीत त्यापैकीच एक. पण तो नुसता खेळत नाहीये तर कॅनडाच्या संघाचं नेतृत्वही करतो आहे. दिलप्रीतने क्विंटशी बोलताना वाटचाल कथन केली. त्याने सांगितलं, ‘मी भारत पाकिस्तान सीमेजवळच्या बाटला या ठिकाणी लहानाचा मोठा झालो. पंजाबला ड्रग्जच्या प्रश्नाने विळखा घातला आहे. सीमेजवळच्या भागात हा प्रश्न अधिकच गंभीर आहे. ड्रग्सच्या ससेमिऱ्यात मी अडकू नये असं बाबांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी क्रिकेट अकादमीत माझं नाव टाकलं. २००७ टी२० वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला सहा षटकार लगावले होते. क्रिकेटची ती आठवण कायमस्वरुपी स्मरणात राहील अशी आहे. पंजाबचा आपला माणूस आंतरराष्ट्रीय स्तरावर असं काही करतो आहे हे पाहणं खूपच प्रेरणादायी होतं. युवराज सिंग माझं प्रेरणास्थान आहे’.
‘कॅनडाला जाणं अगदी अपघाताने झालं. पटियाळा संघाविरुद्धच्या खेळीमुळे चंदीगढ स्टेडियमवर रणजी स्पर्धेसाठी संघात निवड होऊ शकेल अशा खेळाडूंना ट्रायलसाठी बोलावलं होतं. मुल्लापूर इथे ट्रायल झाल्या. नवंकोरं स्टेडियम होतं, खेळपट्टीही चांगली होती. दोनच फलंदाजांनी चांगला खेळ केला. एक होता नमन धीर, जो सध्या पंजाबसाठी आणि आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी चांगला खेळतो आहे. दुसरा होतो मी. रणजीत निवड होऊ शकतं असं मला सांगण्यात आलं. पण माझे बाबा कॅनडात होते. काही कागदपत्रांसंदर्भात मला कॅनडाला जावं लागलं’, असं दिलप्रीतने सांगितलं.
‘U19 स्पर्धेत पटियाळाविरुद्धची खेळी निर्णायक ठरली. पंजाब क्रिकेटमध्ये असं मानलं जातं की तुम्हाला आगेकूच करायची असेल तर पटियाळा संघाविरुद्ध चांगली कामगिरी करून दाखवावी. मी पटियाळाविरुद्धच १३६ धावांची खेळी केली होती’, असं दिलप्रीतने सांगितलं.
‘मला आठवतंय की हरप्रीत ब्रार आणि निखिल चौधरी हे दोघेही मला कॅनडाला जाऊ नको सांगत होते. हरप्रीत पंजाब संघाकडून खेळतो. निखिल ऑस्ट्रेलियात बिग बॅश स्पर्धेत खेळतो. काम महत्त्वाचं होतं आणि मी थोड्याच दिवसात परतणार होतो त्यामुळे मी कॅनडाला गेलो. मी तिथे पोहोचलो आणि काही दिवसातच कोरोनामुळे लॉकडाऊन लागला. जगभर कोरोनाचं संकट होतं. मला मायदेशी परतताच आलं नाही. सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत दोन तीन वर्ष निघून गेली. तोपर्यंत मी कॅनडात स्थिरावलो होतो. तिथे क्रिकेट खेळणं सुरूच होतं त्यामुळे घरचे म्हणाले एकट्याने परत भारतात जाऊन खेळायची गरज नाही. तुझं क्रिकेट खेळायचं स्वप्न इथेही पूर्ण होत आहे, इथेच राहा. मी त्यांचा सल्ला ऐकला’.
‘दोन खेळाडूंनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं. एक म्हणजे बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन. जीटी२० स्पर्धेत माझा त्याच्याशी ओळख झाली. तो आमच्या संघाचा कर्णधार होता. तो किती मोठा खेळाडू आहे हे आपण सगळेच जाणतो. पण माणूस म्हणूनही तो तितकाच भारी आहे. त्याने मला लहान भाऊ मानलं आणि मार्गदर्शन केलं. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांच्यासाठी युवराज सिंगचं जे स्थान आहे ते माझ्यासाठी शकीबचं आहे’.
‘अभिषेक आणि अर्शदीप सिंग हे U23 संघात आम्ही एकत्रच खेळायचो. ते भारतासाठी खेळत आहे याचा प्रचंड आनंद होतो. लहानपणी ज्यांच्याबरोबर एकत्र खेळलो ते देशासाठी खेळत आहेत ही भावनाच सुखावणारी आहे. पंजाबच्या संघात अर्शदीपला संधी मिळत नव्हती. तेव्हा त्याचा वेग कमी होता. चंदीगढमध्ये त्याने कसून मेहनत घेतली. त्यामुळेच आज आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने नाव कमावलं आहे. अमृतसरमधल्या गांधी मैदानात अभिषेक सरावासाठी येत असे. दिवसभर तो सराव करत असे. त्या मेहनतीचं फळ त्याला मिळतं आहे.
‘अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीची मी वाट बघतो आहे. रशीद खान हा जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्याविरुद्ध खेळणं हे निश्चितच आव्हानात्मक असेल’, असं दिलप्रीतने सांगितलं. २३वर्षीय दिलप्रीतने ९ वनडे आणि २० टी२० सामन्यात कॅनडाचं प्रतिनिधित्व केलं आहे. कॅनडाचे तीन सामने झाले असून, तिन्हीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे त्यांचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र वर्ल्डकपसारख्या स्पर्धेत भारतात खेळण्याचा अनुभव दिलप्रीतसह कॅनडा संघासाठी मोलाचा ठरणार आहे.

