PV Sindhu Record: भारताची स्टार बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू सध्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. या स्पर्धेतही तिच्याकडून दमदार खेळ पाहायला मिळाला आहे. स्पर्धेतील प्री क्वार्टर फायनल फेरीत तिने डेन्मार्कच्या लाईन होजमार्कचा पराभव करत स्पर्धेतील क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. हा सामन्यात तिने लाईन होजमार्कचा सरळ सेटमध्ये पराभव केला. पण याआधी झालेल्या सामन्यांमध्ये तिला संघर्ष करावा लागला होता. पहिला सामना जिंकण्यासाठी तिला चांगलाच जोर लावावा लागला. पण प्री क्वार्टर फायनलमध्ये मिळवलेला विजय तिच्यासाठी अतिशय खास ठरला. हा सामना जिंकून तिने असं काही करून दाखवलं आहे, जे याआधी कुठल्याही भारतीय महिला बॅडमिंटनपटूला करता आलं नव्हतं.
असा पराक्रम करणारी ठरली पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू
या स्पर्धेतील प्री क्वार्टर फायनलमध्ये खेळताना सिंधूने लाईन होजमार्क कजेरफेल्डवर अवघ्या ४३ मिनिटात विजय मिळवला. या सामन्यात तिने लाईन होजमार्क कजेरफेल्डला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. या सामन्यातील पहिला सेट तिने २१-१९ आणि दुसरा सेट २१-१८ च्या फरकाने जिंकून क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं. हा सामना ऐतिहासिक असण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे, हा तिच्या बॅडमिंटन कारकिर्दीतील महिला एकेरी प्रकारातील ५०० वा विजय ठरला.
महिला एकेरी प्रकारात ५०० सामने जिंकणारी पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. याआधी कुठल्याही भारतीय महिला बॅडमिंटनपटूला असा पराक्रम करता आलेला नाही. तसेच असा पराक्रम करणारी ती जगातील सहावी महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने या स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या फेरीत तिचा सामना चीनच्या चेन यू फेईसोबत होणार आहे. दोन्ही दिग्गज खेळाडूंपैकी एक आहेत. दोन्ही खेळाडू आतापर्यंत १३ वेळेस आमनेासामने आले आहेत. यादरम्यान फेईने ७ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर सिंधूला ६ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.
इंडोनेशिया मास्टर्स ५०० स्पर्धेत पीव्ही सिंधूसह लक्ष्य सेनने देखील पुरूषांच्या कॅटेगरीत सहभाग घेतला आहे. लक्ष्यने देखील या स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. लक्ष्यने प्री क्वार्टर फायनलमध्ये हाँगकाँगच्या जेसन गुनावनवर २१-१० आणि २१-११ च्या फरकाने विजय मिळवला आहे.लक्ष्यचा क्वार्टर फायनल फेरीतील सामना थायलंडच्या पक्कापोनसोबत होणार आहे.
