PV Sindhu eliminated in the round of 16 : भारताची शटलर पी.व्ही. सिंधूला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी चीनच्या हि बिंग जियाओने टोकियो ऑलिम्पिकमधील पराभवाचा बदला २-० ने घेतला. त्यामुळे पी.व्ही. सिंधूची ऑलिम्पिक पदकाची हॅट्ट्रिक हुकली आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेली चीनची हि बिंग जियाओने महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये सरळ गेममध्ये विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. २९ वर्षीय सिंधू सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरली आणि ५६ मिनिटे चाललेल्या राऊंड ऑफ १६ सामन्यात तिला बिंग जियाओने २१-१९, २१-१४ अशा फरकाने पराभूत केले. भारताला तिच्याकडून इतर खेळाडूंच्या तुलनेत सर्वात जास्त पदकाची आशा होती. मात्र, पी.व्ही.सिंधूने देशवासियांची निराशा केली. पी.व्ही.सिंधूने इतिहास रचण्याची संधी गमावली - तत्पूर्वी रिओ दी जानेरो आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने गटात अव्वल स्थान पटकावत बाद फेरीसाठी पात्रता मिळवली होती. मात्र, आज सिंधूला पराभव पत्करावा लागला. याआधी पी.व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये रौप्य पदक आणि टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये कांस्य पदक जिंकले होते. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताला तिसऱ्या पदकाची आशा होती. मात्र, ती असे करण्यात अपयशी ठरली. जर सिंधू हे करण्यात यशस्वी ठरली असती, तर ती तीन ऑलिम्पिक पदके जिंकणारी भारताच्या इतिहासातील पहिली खेळाडू ठरली असती. या सामन्यात सिंधूची सुरुवात चांगली झाली नाही. बिंग जियाओने काही अचूक स्मॅश मारताना तिने काही चुका केल्या, ज्यामुळे चिनी खेळाडूने ५-१ अशी आघाडी घेतली. सिंधूला कोर्टवर हालचाल करण्यात अडचण येत होती आणि बाहेर काही फटके मारून तिने चीनच्या खेळाडूला ७-२ अशी आघाडी घेण्याची संधी दिली. यानंतर भारतीय खेळाडूने काही चांगले गुण मिळवून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण ब्रेकपर्यंत बिंग जियाओने ११-८ ने आघाडी घेतली. यानंतर सिंधूने चीनच्या खेळाडूवर दबाव आणला. तीन अगदी जवळचे गुण तिच्या बाजूने गेल्यामुळे तिला फायदा झाला. त्यामुळे सिंधूने गुणसंख्या १२-१२ करत बरोबरी साधली. हेही वाचा - Lakshya Sen : लक्ष्य सेनने रचला इतिहास; बॅडमिंटन एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठत १२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी साधली बरोबरी चीनच्या खेळाडूने दबावाखाली काही चुकाही केल्या पण त्यानंतर सलग तीन गुण घेत १७-१४ अशी आघाडी घेतली. सिंधूच्या अंगावर स्मॅश मारत बिंग जियाओने १९-१७ अशी आघाडी घेतली. यानंतर भारतीय खेळाडूने सलग दोन गुण घेत गुणसंख्या १९-१९ अशी केली. चीनच्या खेळाडूने लाईनवर शॉट मारून गेम पॉइंट मिळवला आणि नंतर दीर्घ रॅलीनंतर क्रॉस कोर्टवर ३० मिनिटांत २१-१९ असा पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही बिंग जियाओने सिंधूला तिच्या स्मॅशसह अडचणीत आणले आणि सलग सहा गुणांसह ८-२ अशी आघाडी घेतली. हेही वाचा - Paris Olympics 2024 : पदक जिंकल्याचं बेभान सेलिब्रेशन पडलं महागात, ज्युडोपटूचा खांदाच निखळला, VIDEO व्हायरल सिंधूने सलग तीन गुणांसह गुणसंख्या ५-८ ने केली परंतु बिंग जियाओने सलग पाच गुणांसह १३-५ अशी भक्कम आघाडी घेतली. सिंधूने बाहेर काही शॉट मारले, ज्यामुळे चीनच्या खेळाडूने स्कोअर १६-८ असा केला. यानंतरही सिंधूने बाहेरू शॉट मारल्यानंतर बिंग जियाओने १९-११ अशी आघाडी घेतली. भारतीय खेळाडूने सलग दोन गुण मिळवले पण त्यानंतर बिंग जियाओने कोर्टच्या शेवटच्या भागात शॉट खेळून सात मॅच पॉइंट मिळवले. सिंधूने एक मॅच पॉइंट वाचवला पण नंतर शॉट वाईड मारला आणि खेळ आणि सामना बिंग जियाओच्या झोळीत टाकला.