क्वालालम्पूर : दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने बुधवारी मलेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत संघर्षपूर्ण विजय मिळवला. परंतु सायना नेहवालने सलग दुसऱ्या स्पर्धेत सलामीच्या सामन्यातच गाशा गुंडाळला.

महिला एकेरीत सिंधूने चीनच्या ही बिंग जियाओला २१-१३, १७-२१, २१-१५ असे नामोहरम केले आणि दुसरी फेरी गाठली. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने पहिला गेम जिंकूनही दक्षिण कोरियाच्या किम गा ईयूनविरुद्ध २१-१६, १७-२१, १४-२१ असा पराभव पत्करला. सायना मलेशिया खुल्या स्पर्धेतही पहिल्याच फेरीत गारद झाली होती.

पुरुष एकेरीत एचएस प्रणॉय, बी साईप्रणीत आणि पारुपल्ली कश्यप यांनी दिमाखदार विजयांसह दुसरी फेरी गाठली. प्रणॉयने फ्रान्सच्या ब्राइक लेव्हर्डेझला २१-१९, २१-१४ असे नमवले. तसेच प्रणीतने ग्युटेमालानच्या केव्हिन कॉर्डनला २१-८, २१-९ असे पराभूत केले. तर कश्यपने मलेशियाच्या टॉमी सुग्यार्तोचा १६-२१, २१-१६, २१-१६ असा पराभव केला. समीर वर्माचे आव्हान मात्र संपुष्टात आले. समीरने चायनीज तैपेईच्या चौथ्या मानांकित चोऊ टीन चेनकडून २१-१०, १२-२१, १४-२१ असा पराभव पत्करला.

महिला दुहेरीत एन सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा जोडीने इंडोनेशियाच्या फॅब्रियाना कुसुमा आणि एमेलिया प्रॅटिवी जोडीकडून १९-२१, २१-१८, १६-२१ अशी हार पत्करली.