PV Sindhu Japan Open Title Comeback Story Virat Kohli: जपान ओपनमध्ये गेल्या आठवड्यात विजेतेपद पटकावल्यानंतर पदक वितरण समारंभात पी. व्ही. सिंधूच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. दोन वर्षांहून अधिक काळानंतर मिळालेल्या या मोठ्या विजेतेपदामागची खरी सुरुवात मात्र बंगळुरूमध्ये झालेल्या एका साध्या, नियोजन नसलेल्या भेटीत झाली होती. विराट कोहलीची सिंधूच्या या पुनरागमनामागे मोठी भूमिका आहे.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने एकदा विराट कोहलीला त्याच्या शतकांच्या दीर्घ प्रतीक्षेच्या काळाबद्दल प्रश्न विचारला होता. सलग अनेक सामने शतक न झळकावल्यानंतर त्या कठीण काळातून तो कसा बाहेर पडला, हे तिने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर विराटने तिला सांगितलं की, धावा करण्याचा आनंद पुन्हा शोधून काढणं हेच त्याच्या पुनरागमनाचं खरं रहस्य होतं. सिंधूचा पती वेंकट दत्ता साईही त्यावेळी उपस्थित होता आणि विराटच्या त्या शब्दांचा त्याच्यावर खोल परिणाम झाला.

काही महिन्यांनी पायाच्या बोटाचं लिगामेंट तुटल्यामुळे सिंधूला प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी तब्बल तीन महिने पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र, सिंधू सतत आपण पुन्हा कोर्टवर कधी परतू शकते, याबद्दल डॉक्टरांना विचारत होती. त्यावेळी डॉ. पारडीवाला यांनी दत्ता साईला बाजूला घेत सांगितलं, “पुढील तीन आठवडे तिच्या पुनरागमनाचा कोणताही प्रश्नच नाही. तिला विश्रांतीची गरज आहे, नाहीतर ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे थकून जाईल.”‘

सिंधूने कसं केलं बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन?

डॉक्टरांचे शब्द ऐकल्यानंतर दत्ता साईच्या मनात विराट कोहलीचे तेच शब्द पुन्हा घुमू लागले. त्याने तातडीने अमेरिकेतील अटलांटा येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे जाण्याचं ठरवलं. सिंधूला सतत “तू जिंकत का नाहीस?” किंवा “तू अजूनही खेळतेस कशासाठी?” अशा प्रश्नांपासून दूर ठेवण्यासाठी तो तिला अटलांटाला घेऊन गेला.

दत्ता साई म्हणाला, “आम्हाला सिंधूच्या मनात पुन्हा खेळाचा आनंद निर्माण करायचा होता. विराटचे ते शब्द माझ्या सतत लक्षात होते. अटलांटामधील ‘एक्सोस स्पोर्ट्स परफॉर्मन्स’ केंद्रात वेन, टिम आणि रायन या उत्कृष्ट प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूने पुनर्वसन आणि फिटनेसवर काम केलं. माझी बहीण दररोज तिला तीन आठवडे या केंद्रात घेऊन जात होती. कुटुंबासोबत राहिल्यामुळे ती तिथे स्टार खेळाडू नव्हती, तर एक सर्वसामान्य व्यक्ती होती. त्या वातावरणात आम्ही तिच्या मनात खेळाविषयीचं प्रेम आणि आनंद पुन्हा जागवला.”

सिंधूच्या पुनरागमनाचा पाया ‘स्थैर्य’ (Stability) असल्याचं तिचा पती वेंकट दत्ता साई ठामपणे सांगतो. तो हा शब्द वारंवार वापरतो. त्यामुळेच जपान ओपनचं विजेतेपद जिंकल्यानंतर सिंधू पोडियमवर हसताच तिच्या १३ सदस्यांच्या सपोर्ट स्टाफच्या डोळ्यांतही आनंदाश्रू होते. प्रत्येक सदस्य आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असून, सिंधूच्या यशामागे त्यांचं मोलाचं योगदान आहे. सिंधूने स्वतःही आपल्या संपूर्ण सपोर्ट टीमची नव्याने उभारणी केल्याचं श्रेय दत्ता साईला दिलं आहे.

दत्ता साईचा डेटा अॅनालिटिक्सवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सिंधूची संपूर्ण टीम स्पोर्ट्स सायन्सच्या आधारे काम करते. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी दक्षिण आफ्रिकेचे फिटनेस तज्ज्ञ वेन लोम्बार्ड यांना संघात सामील करण्यात आलं. ३० वर्षांवरील खेळाडू म्हणून सिंधूला भेडसावणाऱ्या शारीरिक आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला. मुख्य प्रशिक्षक इरवानस्याह यांची नियुक्तीही सिंधूसाठी महत्त्वाची ठरली. मात्र, तिच्या पुनरागमनाच्या तिसऱ्या टप्प्यात (3.0) केवळ प्रशिक्षक नव्हे, तर अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्सचीही साथ आवश्यक असल्याचं टीम सिंधूचं मत होतं.

दत्ता साई सांगतो, “पॅरिस ऑलिम्पिकनंतर आम्ही डेटाचं विश्लेषण केलं. त्यातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिली म्हणजे सिंधूचा आक्रमक खेळ कमी झाला होता. दुसरी म्हणजे अव्वल खेळाडूंविरुद्ध गुण मिळवण्यासाठी तिला एका रॅलीत दुसरा, तिसरा किंवा चौथा आक्रमण करावं लागत होतं. त्यामुळे चुका होण्याची शक्यता वाढत होती. पूर्वी ती शटल सीमारेषेबाहेर जाणार की नाही, याचा दोन वेळा अंदाज घेत असे. आता मात्र ती सहा वेळा असा अंदाज घेत होती. म्हणजेच सहज गुण मिळतील, अशी ती आशा ठेवत होती.”

तंत्रज्ञानाची आवड असलेल्या दत्ता साईने गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात सिंधूच्या प्रशिक्षणात मोठे बदल करत सात अत्याधुनिक ट्रॅकिंग उपकरणांचा वापर सुरू केला. तिच्या शरीरावर येणारा ताण (लोड) अत्यंत बारकाईने नियंत्रित करण्यात आला. हृदयाचे ठोके, झोपेचा कालावधी, झोपेची गुणवत्ता, रॅलीदरम्यानचा ताण अशा प्रत्येक बाबीवर तासागणिक लक्ष ठेवण्यात येत होतं.

याच काळात हीरा मुंडलुरू फिजिओथेरपिस्ट म्हणून संघात दाखल झाले, श्रेयसी संजय यांनी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगची जबाबदारी स्वीकारली, तर आहारतज्ज्ञ निकोल हारिया सिंधूच्या प्रत्येक घासावर लक्ष ठेवत होत्या.

जपान ओपन जिंकल्यानंतर बक्षीस म्हणून सिंधूला २३० ग्रॅम चिकन (प्रथिनांनी भरलेला आहार) आणि तिच्या आवडीचं आइसक्रीम खायला देण्यात आलं. दत्ता साई सांगतो की, तीशी ओलांडल्यानंतर तब्बल ३.५ किलो वजन कमी करणं, तेही स्नायूंचं वजन न घटवता, अत्यंत कठीण होतं.